मुंबई : लेनोव्हो लवकरच मोटो जी 5 एस प्लस आणि मोटो जी 5 एस हे दोन स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. मोटो जी 5 एस प्लसचा नुकताच एक फोटो लीक झाला आहे, ज्यामध्ये या फोनला ड्युअल रिअर कॅमेरा असल्याचं दिसत आहे.


मोटोने आत्ताच भारतात मोटो ई 4 आणि मोटो ई 4 प्लस हे दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. याशिवाय न्यूयॉर्कमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे, ज्यामध्ये मोटो झेड 2 फोर्स आणि मोटो एक्स 4 हे दोन स्मार्टफोन लाँच केले जाण्याची शक्यता आहे.

मोटो जी 5 एस मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा असेल, असं 'स्लॅशलीक्स'च्या वृत्तात म्हटलं आहे. तर काही दिवसांपूर्वीच लाँच झालेल्या मोटो जी 5 प्लसला केवळ सिंगल कॅमेरा देण्यात आला होता. मोटो जी 5 एस प्लसला 13 मेगापिक्सेल ड्युअल रिअर कॅमेरा असण्याची शक्यता आहे. तर मोटो जी 5 प्लसप्रमाणेच 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा असेल, असं बोललं जात आहे.

लीक फोटोंनुसार मोटो जी 5 एस प्लसची स्क्रीन 5.5 इंच आकाराची असेल. तर मेटल बॉडी आणि 7.1.1 अँड्रॉईड नॉगट सिस्टम असेल, असा अंदाज आहे. 4 GB रॅम, 64 GB स्टोरेज, स्नॅपड्रॅगन 625 प्रोसेसर आणि गोल्ड, सिल्व्हर आणि ब्लॅक या कलर्समध्ये हा फोन उपलब्ध असेल.

यापूर्वीही या स्मार्टफोनच्या बाबतीत माहिती समोर आली होती. मोटो जी 5 एस प्लस, मोटो एक्स 4 आणि मोटो झेड 2 फोर्स हे तिन्ही स्मार्टफोन लाँच केले जाणार असल्याचं वृत्त होतं. मोटो जी 5 एस प्लसची किंमत 17 हजार 999 रुपये, मोटो एक्स 4 ची 20 हजार 999 रुपये आणि मोटो झेड 2 फोर्सची किंमत 38 हजार 999 रुपये असेल, असाही दावा या वृत्तात करण्यात आला होता.