न्यूयॉर्क: अमेरिकेत सध्या नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचीच जास्त चर्चा सुरु असल्याचं दिसून आलं आहे.


पंतप्रधान मोदींच्या पावलावर पाऊल टाकत ट्रम्प यांनी कालच जाहीर केलं होतं. आपण फक्त 1 डॉलर पगार घेणार असून एकही सुट्टी न घेता काम करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आज सोशल नेटवर्किंग वेबसाइट फेसबुकवर अमेरिकत चक्क ट्रम्प यांना पाठी टाकून पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होते होते.

फक्त भारताताच नव्हे तर अमेरिकेतही पंतप्रधान मोदींचा बोलबाला असल्याचं दिसून येत आहे. देशात नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर मोदी आणि निर्णयाबाबत देशभरात बरीच चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे आपण मोदींसारखं काम करणार असल्याच्या दावा करणारे ट्रम्प हे सोशल मीडियावर मोदींच्या पिछाडीवर आहेत.


दरम्यान, अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल टाकलं आहे. वर्षाला केवळ एक डॉलर (अंदाजे 65 ते 67 रुपये) पगार घेणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. त्याचप्रमाणे एकही सुट्टी न घेता काम करणार असल्याची घोषणाही ट्रम्प यांनी केली आहे. सीबीएस या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे सांगितलं.

अमेरिकेच्या अध्यक्षाला वर्षाला 4 लाख डॉलर्स (अंदाजे 2 कोटी 70 लाख रुपये) इतका घसघशीत पगार मिळतो. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी तो नाकारला आहे. मला राष्ट्राध्यक्षाचा पगार किती असतो, हे माहित नाही, पण नियमानुसार मला एक डॉलर इतकी रक्कम घ्यावीच लागेल, असं ते म्हणाले. सप्टेंबर महिन्यात त्यांनी केलेल्या जाहीरनाम्यात पगार घेणार नसल्याचं सांगितलं होतं.