मुंबई : तुम्ही जुनी गाडी विकत घेण्याच्या तयारीत असाल तर थोडं थांबा. जुनी गाडी विकत घेताना सर्वात मोठी चिंता असते ती म्हणजे गाडी चोरीची तर नसेल ना? किंवा या गाडीच्या नावावर एखादा गुन्हा तर नसेल ना? या सर्व समस्यांमधून ग्राहकांची आता मुक्तता होणार आहे. परिवहन विभागाने एक असं अॅप तयार केलं आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला गाडीचा नंबर सर्च करताच सर्व माहिती मिळेल.
देशभरात परिवहन विभागाने एम परिवहन (m parivahan) नवाचं एक नवीन अॅप लाँच केलंय. यात देशभरातील वाहनांची संपूर्ण माहिती दिली जाणार आहे. वाहनाचा मालकी हक्क कोणाचा आहे, वाहनांवर परिवहन विभागाने काही कारवाई केली आहे का, वाहन डिझेलवर आहे, की पेट्रोलवर अशी संपूर्ण माहिती एका ठिकाणी मिळेल.
काय आहे एम परिवहन अॅप?
एम परिवहन हे अॅप परिवहन विभागाकडून लाँच करण्यात आलं आहे. या अॅपमध्ये तुम्ही दुचाकी, चार चाकी या वाहनांचा नंबर सर्च केल्यास त्या वाहनाबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. शिवाय वाहन परवाना नंबर सर्च करुन त्याबद्दल आणि त्या व्यक्तीबद्दल माहिती मिळवता येईल. नवीन वाहन चालकाला वाहन परवाना कशा पद्धतीने मिळवता येईल, याबाबतही या अॅपमध्ये माहिती मिळेल.
एम परिवहनचा वापर कसा कराल?
तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरुन एम परिवहन हे अॅप डाऊनलोड करावं लागेल.
अॅप ओपन केल्यानंतर तुम्हाला दोन पर्याय दिसतील. (व्हर्च्युअल आरसी आणि व्हर्च्युअल डीएल)
यानंतर एम परिवहन अॅपचं होम पेज ओपन होईल, सर्च पर्याय निवडून त्यात तुमचा वाहन नंबर सर्च करा. तुम्हाला तुमचा वाहनाबद्दल संपूर्ण माहिती मिळेल.
वाहन चालक परवाना, वाहनांचे कागदपत्र यावरुन पोलीस प्रशासन आणि वाहन चालक यांच्यात नेहमी वाद होत असतात. वाहनचालक कागदपत्र घरी विसरल्यास त्यांना पोलिसांनी पकडल्यास दंड भरावा लागतो. त्यामुळे आता एम परिवहन अॅपद्वारे वाहनांचे कागदपत्र पोलिसांना डिजिटल पद्धतीने दाखवता येणार आहेत. डिजिटल वाहन परवाना मिळण्यासही सुरुवात होणार आहे.
तेलंगणा राज्यात डिजिटल वाहन परवान्याची सुविधा अगोदरच सुरु झालेली आहे. त्यामुळे आता संपूर्ण देशभरात प्रभावीपणे याची अंमलबजावणी होण्याची आशा आहे.
कागदपत्र सांभाळण्यापासून मुक्ती, गाडीचा नंबर टाका आणि सर्व माहिती मिळवा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Oct 2018 02:16 PM (IST)
वाहनाची कागदपत्र सांभाळणं, किंवा जुनं वाहन विकत घेताना ते योग्य आहे का याची खात्री करणं ही मोठी समस्या असते. परिवहन विभागाने या समस्येचं निराकरण केलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -