मुंबई : रिलायन्स जिओचा 4जी फीचरफोनला टक्कर देण्यासाठी मायक्रोमॅक्सनं बीएसएनएलच्या साथीनं 'भारत-1' हा नवा 4जी फोन नुकताच लाँच केला आहे. 50 कोटी फोन यूजर्सच्या गरजा लक्षात ठेऊन हा फोन लाँच केल्याचं कंपनीनं लाँचिंगवेळी म्हटलं आहे.


भारत-1 या फोनमुळे अनेक यूजर्सला बराच फायदा होणार असल्याचा कंपनीचा दावा आहे. दरम्यान, या फोनवर ग्राहकांना बीएसएनएलच्या 97 रुपयांच्या प्लॅनवर अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा मिळणार आहे.

भारतातील अनेक लोकं आजही इंटरनेटपासून दूरच आहेत. त्याच लोकांनी इंटरनेटशी जोडलं जावं अशी कंपनीची इच्छा आहे.

मायक्रोमॅक्सचा को-फाउंडर राहुल शर्मा म्हणाले की, 'बीएसएनएल ही देशातील प्रमुख टेलिकम्युनिकेशन सर्व्हिस प्रोवाइडर आहे. याचं नेटवर्क हे देशातील कानकोपऱ्यात पोहचलं आहे.'

दरम्यान, बीएसएनएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनुपम श्रीवास्तव म्हणाले की, 'मायक्रोमॅक्ससोबत भागीदारी करणं ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. मायक्रोमॅक्स ही एक भारतीय कंपनी आहे. जिचं भारताच्या विकास प्रक्रियेत महत्त्वपूर्ण योगदान आहे. आतापर्यंत 15 कोटी यूजर्स मायक्रोमॅक्सचे ग्राहक आहेत आणि दिवसेंदिवस ही संख्या वाढतच आहे. आम्हाला आशा आहे की, भारत-1 सोबत यूजर्सला डेटा आणि कॉलिंगचा एक वेगळा अनुभव नक्कीच मिळेल.'