मुंबई : अॅपलने SE सीरिजमधील तुलनेने स्वस्त आयफोन लाँच केल्यानंतर एलजी या स्मार्टफोन उत्पादक कंपनीनेही त्यांच्या LG G5 या हायएन्ड फ्लॅगशिप स्मार्टफोनची SE एडिशन मार्केटमध्ये उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.


एलजी G5 या फ्लॅगशिपचं SE व्हर्जन लाँच करणार असल्याची चर्चा स्मार्टफोन आणि गॅझेटप्रेमींच्या क्षेत्रात अनेक दिवसांपासून होती, आता त्याला पूर्णविराम मिळाला आहे. एलजी G5 च्या SE व्हर्जनमध्ये लेटेस्ट अँड्राईड ओएस मार्शमेलो बरोबरच स्नॅपड्रॅगनचा 625 हा तुलनेने कमी क्षमतेचा प्रोसेसर असल्याचं रशियातून आलेल्या वृत्तात म्हटलं आहे. एलजीच्या LG G5 या स्मार्टफोनमध्ये सध्या स्नॅपड्रॅगन 820 हा सध्याचा सर्वात शक्तीशाली प्रोसेसर आहे. मात्र SE व्हर्जनमध्ये प्रोसेसरची क्षमता घटवण्यात येणार असल्याची शक्यता आहे.

एलजीने G5 या स्मार्टफोनची घोषणा वर्ल्ड मोबाईल काँग्रेसमध्ये केली होती. त्यानंतर रशियात एका कार्यक्रमात एलजीनेच LG G5 च्या SE व्हर्जनची घोषणा केली. हायएन्ड LG G5 आणि त्याचं SE व्हर्जनमध्ये सध्या तरी फक्त प्रोसेसरचाच काय तो फरक आहे. रशियातून आलेल्या काही रिपोर्ट्सवरुन LG G5 च्या एसई व्हर्जनमध्ये रॅमबाबतही काहीशी तडजोड करण्यात आल्याची शक्यता आहे. LG G5 या स्मार्टफोनला 4 जीबी रॅम आहे तर त्याच्या SE व्हर्जनसोबत 3 जीबी रॅम देण्यात आला आहे.

अन्य स्पेसिफिकेशन्समध्ये फारसा बदल करण्यात आलेला नाही. म्हणजे LG G5 आणि LG G5 SE या दोन्ही व्हर्जनमध्ये स्क्रीन 5.3 इंच आणि डिस्प्ले QHD रिझोल्यूशनचा आहे.

LG G5 आणि LG G5 SE या दोन्ही व्हर्जनमध्ये कॅमेराही सारखाच आहे. दोन्ही स्मार्टफोनचा रिअर म्हणजे मुख्य कॅमेरा 16 मेगापिक्सेलचा तर फ्रंट म्हणजे सेल्फी कॅमेरा 8 मेगापिक्सेलचा आहे. दोन्ही स्मार्टफोनची बॅटरी 2800 mAh क्षमतेची असून फिंगरप्रिंट स्कॅनरची सुविधा देण्यात आली आहे.