मुंबई : भारतीय स्मार्टफोन मेकर कंपनी लाव्हाने सर्व महत्त्वाच्या वस्तू, स्मार्टफोन आणि फीचर फोनसाठी दोन वर्षांची वॉरंटी देण्याची घोषणा केली आहे. भविष्यात लाँच होणाऱ्या कंपनीच्या सर्व फोनलाही दोन वर्षांचीच वॉरंटी असेल, असंही लाव्हाने स्पष्ट केलं.

कंपनीच्या कोणत्याही उत्पादनांवर 2 वर्षांची वॉरंटी देणारी लाव्हा ही पहिलीच भारतीय कंपनी असल्याचा दावा कंपनीने केला आहे. तुम्ही 26 ऑगस्टनंतर लाव्हाचा कोणताही फोन खरेदी केला तर त्यावर 2 वर्षांची वॉरंटी असेल.

एलसीडी डिस्प्ले, हेडफोन, बॅटरी यांसारख्या अॅक्सेसरिजवर अगोदरप्रमाणेच 6 महिन्यांची वॉरंटी असेल, असंही कंपनीने स्पष्ट केलं. कोणकोणत्या मोबाईलवर 2 वर्षांची वॉरंटी असेल, त्याची माहिती लाव्हाच्या वेबसाईटवर उपलब्ध केली जाणार आहे.