नवी दिल्ली : आयटी क्षेत्रातील जायंट मानल्या जाणाऱ्या ‘इन्फोसिस’ कंपनीची धुरा खांद्यावर घेतल्यानंतर पहिल्यांदाच नंदन निलेकणी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. इन्फोसिसमधील अनिश्चितता दूर होऊन, स्थिरता येईपर्यंत पदावर राहीन, असे निलेकणी म्हणाले.
येत्या ऑक्टोबरमध्ये इन्फोसिसच्या आगामी वाटचालीसाठी रोडमॅप देईन. त्याचसोबत सीईओच्या निवडीसोबतच कंपनीच्या वाढीसाठीच्या स्ट्रॅटेजीचीही घोषणा केली जाईल, असे नंदन निलेकणी यांनी सांगितले.
नंदन निलेकणी ‘इन्फोसिस’च्या नॉन एक्झिक्युटीव्ह चेअरमनपदी
नंदन निलेकणी यांची इन्फोसिस कंपनीच्या नॉन एक्झिक्युटीव्ह चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आली आहे. निलेकणी हे आयटी क्षेत्रातील जायंट मानल्या जाणाऱ्या इन्फोसिस कंपनीचे संहसंस्थापक आहेत.
विशाल सिक्का यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा राजीनामा दिल्यानंतर कंपनीचे नेतृत्व कोणाकडे येणार, याची उत्सुकता होती. सिक्का यांच्या राजीनाम्याचा कंपनीच्या शेअरच्या किमतींवरदेखील परिणाम झाला होता. त्यामुळे आता निलेकणी यांच्याकडे कंपनीच्या नॉन एक्झिक्युटीव्ह चेअरमनपदी जबाबदारी देण्यात आली आहे.
कंपनीच्या संचालक मंडळावरील विद्यमान अध्यक्ष आर. शेषसायी आणि सहअध्यक्ष रवी व्यंकटेशन यांनी राजीनामे दिल्यानंतर सहसंस्थापक असलेले निलेकणी कंपनीत परतले आहेत.
नारायण मूर्ती यांच्याप्रमाणेच ‘इन्फोसिस’चे सहसंस्थापक असलेले नंदन निलेकणी हे 2002 ते 2007 या काळात कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. त्यानंतर निलेकणी यांची यूआयडी प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली होती.