मुंबई : रिलायन्स जिओने दूरसंचार क्षेत्रात पाऊल ठेवल्यापासून इतर कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. अनलिमिटेड डेटा आणि मोफत व्हॉईस कॉलिंग यामुळे ग्राहक जिओलाच पसंती देतात. VoLTE सेवा देणारी जिओ पहिलीच दूरसंचार कंपनी आहे. कंपनीने आता व्हॉईस कॉलिंगबाबत काही नियम आणि अटी स्पष्ट केल्या आहेत.


जिओच्या VoLTE सेवेमुळे तुम्हाला कितीही वेळ व्हॉईस कॉलिंगचा वापर करण्याचा अधिकार आहे. मात्र एका दिवसात 300 पेक्षा जास्त मिनिटांचा वापर झाल्यास मोफत व्हॉईस कॉलिंग बंद करण्याचा अधिकार कंपनीकडे असल्याचं जिओने म्हटलं आहे.

दररोज 300 मिनिटे, आठवड्याला 1200 मिनिटांपेक्षा जास्त किंवा एका महिन्यात 3 हजार मिनिटांपेक्षा जास्त वापर झाल्यास हा व्यवसायिक वापर समजला जाईल. असं आढळून आल्यास मोफत व्हॉईस कॉलिंग सेवा बंद करण्याचा अधिकार कंपनीला असल्याचं जिओने सांगितलं. कारण हा प्लॅन केवळ वैयक्तिक वापरासाठी आहे.

आतापर्यंत असं एकही प्रकरण आढळून आलेलं नाही. मात्र जिओचा वापर वैयक्तिक वापरासाठी होत आहे का व्यवसायिक, हे ओळखण्याची व्यवस्था कंपनीकडे आहे. असं आढळून आल्यास कंपनीकडून ग्राहकाची पडताळणी केली जाईल, असं जिओच्या एका अधिकाऱ्याने गॅजेट नाऊशी बोलताना सांगितलं.