नवी दिल्ली : शाओमीचा नवा स्मार्टफोन Mi Max 2 सोबत रिलायन्स जिओ 100 जीबी डेटा मोफत देणार आहे. या फोनच्या लाँचिंग इव्हेंटमध्ये रिलायन्स जिओचे अधिकारी सुनील दत्त यांनी काही महत्वाच्या घोषणाही केल्या. रिलायन्स जिओ मोबाईल डेटा ट्रॅफिकमधील 15 टक्के भागीदारीसह जगातील सर्वात मोठं डेटा नेटवर्क असल्याचं दत्त यांनी सांगितलं.
रिलायन्स जिओच्या लाँचिंगपूर्वी भारतात प्रत्येक महिन्याला 0.2 गीगाबाईट मोबाईल डेटा वापरला जायचा. मात्र जिओनंतर हा आकडा 1.2 गीगाबाईट एवढा झाला आहे. यामध्ये 1 गीगाबाईट डेटा केवळ जिओचे ग्राहकच वापरतात, असा दावा सुनील दत्त यांनी केला.
रिलायन्स जिओने 5 सप्टेंबर 2016 रोजी मोफत डेटा, मोफत व्हॉईस कॉलिंग ऑफर देत सेवा सुरु केली. त्यानंतर इतर कंपन्यांच्या ग्राहकांनीही जिओला पसंती दिली. जिओने सर्वात वेगाने 10 कोटी ग्राहक जोडण्याचा विक्रमही केला आहे.
सुनील दत्त यांनी दावा केला की, 85 टक्के मोबाईल डेटा जिओचा वापरला जातो. म्हणजेच एअरटेल, व्होडाफोन, आयडिया या इतर कंपन्यांची यातील भागीदारी केवळ 15 टक्के आहे. व्हिडिओसाठी लागणारा डेटा हा सर्व जिओचा आहे, असाही दावा दत्त यांनी केला.
रिलायन्स जिओचे 3 लाख 60 हजार ग्राहक दररोज व्हिडिओ कॉलिंग करतात. जगभरातील डेटा ट्रॅफिकमध्ये जिओचा सहभाग 15 टक्के आहे. हा आकडा भारताला जगभरातील टॉप देशांच्या यादीत आणतो, अशी माहिती सुनील दत्त यांनी दिली.