न्यूयॉर्क : जुने स्मार्टफोन्स स्लो होण्यामागे अनेक कारणं असतात. मात्र जुने आयफोन स्लो होण्याचं कारण खुद्द अॅपल कंपनीने उघड केलं आहे. आयफोनची ऑपरेटिंग सिस्टीम स्लो व्हावी, यासाठी कंपनीने सॉफ्टवेअर तयार केलं होतं.


तुमचा आयफोन जुना असेल आणि स्लो व्हायला लागला असेल, तर अॅपल कंपनीच हे जाणूनबुजून करत आहे, हे लक्षात घ्या. जुन्या आयफोनचं लाईफ वाढवण्यासाठी परफॉर्मन्स कमी केला जातो. यामध्ये आयफोन 7, 6, 6s, SE यांचा समावेश आहे.

'आयफोनधारकांना उत्तम अनुभव देणं, हे आमचं उद्दिष्ट आहे. यामध्ये ओव्हरऑल परफॉर्मन्स आणि डिव्हाईस लाईफ यांचा समावेश आहे. लिथियम आयर्न बॅटरीज थंड वातावरणात पीक करंट देण्यास कमी पडतात. बॅटरीज जुन्या झाल्यावर चार्जिंगही कमी होत जातं. त्यामुळे मोबाईलच्या सुरक्षिततेसाठी डिव्हाईस आपणहून शटडाऊन व्हायला लागतात.' असं अॅपलने 'टेक क्रंच'ला सांगितलं.

'बॅटरी क्षमता कमी असल्यामुळे आयफोन स्लो होतो आणि त्याच्या परफॉर्मन्सवरही परिणाम होतो.' असं स्मार्टफोन बेंचमार्कमध्ये लोकप्रिय असलेल्या गीकबेंज या सॉफ्टवेअरवरील अहवालात म्हटलं आहे.

आयफोनचं नवीन व्हर्जन लाँच झाल्यावर जुन्या आयफोनचे परफॉर्मन्स स्लो होत असल्याचा आरोप अनेक यूझर्स करतात. लोकांनी कंटाळून नवा आयफोन घ्यावा, या उद्देशाने अॅपल हे मुद्दाम करत असल्याचंही अनेक जण म्हणातात.