नवी दिल्ली: अॅपलचे फोन आणि त्याचे दुसरे प्रोडक्ट लवकरच देशात बनणं सुरु होणार आहे. अॅपलचे सीईओ टीम कूक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या बैठकीत यावर चर्चा झाली.


 

पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, कूक यांनी भारतासाठी अॅपलच्या भविष्यातील योजनांवर चर्चा केली. त्यामुळे अशी आशा आहे की, देशात लवकरच अॅपल फोनचं उत्पादन सुरु होऊ शकतं.

 

भारतीय बाजारपेठेतील स्वस्त स्मार्टफोनची बाजरपेठ लक्षात घेता अॅपल इथं कमी किंमतीच्या स्मार्टफोन तयार करु शकतं. पण अॅपलनं स्पष्ट केलं आहे की, किंमत कमी करण्यासाठी गुणवत्तेसोबत तडजोड करणार नाही.

 

अॅपलच्या रिटेलिंग योजनेमध्ये मात्र, एक अडचण आहे. कारण की, कमीत कमी 30 टक्के कच्चा माल हा स्थानिक बाजारातून घेणं अनिवार्य आहे. पण अॅपलच्या मते, आयफोनसाठी लागणारा कच्चा माल इथं तयार होत नाही. त्यामुळे ही अट पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे ही अट शिथील करण्याची अॅपल कंपनीची इच्छा आहे. मात्र, याबाबत सरकारनं आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.

 

दरम्यान, अॅपलचे प्रमुख टीम कूक यांनी मेक इन इंडियाचं कौतुक केलं आहे. तसंच याचदरम्यान, त्यांनी हैदराबादच्या नव्या डेव्हलपमेंट सेंटरबद्दलही पंतप्रधानांना संपूर्ण माहिती दिली.