वॉशिंग्टन : भारतात नवीन-नवीन इंटरनेट शिकणाऱ्यांनी ‘गुड मॉर्निंग’च्या मेसेजचा धुमाकूळ घातला आहे. व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इतर सोशल मीडियावर सर्वात जास्त 'गुड मॉर्निंग'चे मेसेज पाठवले जात आहेत. मात्र या मेसेजमुळे युझर्सच्या फोनचं स्टोरेज कमी होत आहे.
‘गुड मॉर्निंग’च्या मेसेजमुळे भारतातील तीन पैकी एक स्मार्टफोन आऊट ऑफ स्पेस असल्याचं एका संशोधनातून समोर आलं आहे. ‘वॉल स्ट्रीट जर्नल’च्या वृत्तानुसार गुगलने ही समस्या शोधून काढली आहे.
भारतात कोट्यवधी लोक पहिल्यांदाच इंटरनेट वापरत असतात किंवा वापरायला सुरुवात केलेली असते. इंटरनेट वापरायला सुरुवात केलेली असताना ते सर्वात जास्त 'गुड मॉर्निंग'चे मेसेज पाठवतात. यामध्ये सूर्यफुल, सूर्योदय, लहान मुलं, पक्षी आणि सूर्यास्त या फोटोंचा जास्त समावेश असतो.
संशोधनानुसार, गुगलवर ‘गुड मॉर्निंग’साठी फोटो शोधणाऱ्यांच्या संख्येत गेल्या पाच वर्षात दहा पटीने वाढ झाली आहे. याच समस्येमुळे फेसबुक आणि व्हॉट्सअॅपने गेल्या वर्षीपासून फोटो स्टेटसचं फीचर दिलं आहे, गुड मॉर्निंगचा मेसेज करता येईल. हे स्टेटस 24 तासांसाठी असतं.