व्हॉट्सअॅपवरुन मेसेज डीलीट करण्याची 7 मिनिटांची मर्यादा दूर
एबीपी माझा वेब टीम | 05 Mar 2018 01:23 PM (IST)
आतापर्यंत सात मिनिटांच्या आतच मेसेज डीलीट करण्याचा पर्याय होता, मात्र हा कालावधी कमी असल्याची ओरड व्हॉट्सअॅप यूझर्सनी केल्यामुळे तो वाढवण्यात येणार आहे.
मुंबई : 'व्हॉट्सअॅप'वर चुकून पाठवलेला मेसेज सात मिनिटांच्या आत डीलीट करण्याची पर्वणी 'डीलीट फॉर एव्हरीवन' फीचरमुळे यूझर्सना मिळाली होती. आता हा कालावधी वाढवण्यात येणार असून तुम्ही 70 मिनिटांच्या आत पाठवलेला मेसेज डीलीट करु शकाल. 'डब्ल्यूएबीटाइन्फो' वेबसाईटच्या माहितीनुसार व्हॉट्सअॅप यूझर्स 4 हजार 96 सेकंदांच्या आत मेसेज डीलीट करु शकतील. म्हणजेच 68 मिनिटं 16 सेकंदांच्या आत तुम्हाला मेसेज डीलीट करण्याची संधी आहे. अँड्रॉईड स्मार्टफोन यूझर्सना हा ऑप्शन आधी उपलब्ध होणार असून आयफोन धारकांना काही काळ थांबावं लागेल. आतापर्यंत सात मिनिटांच्या आतच मेसेज डीलीट करण्याचा पर्याय होता, मात्र हा कालावधी कमी असल्याची ओरड व्हॉट्सअॅप यूझर्सनी केल्यामुळे तो वाढवण्यात येणार आहे. व्हॉट्सअॅप बीटाच्या अँड्रॉईड 2.18.69 व्हर्जनवर नवीन फीचर उपलब्ध आहे. नॉन-बीटा अँड्रॉईड यूझरना ते कधी अवेलेबल होणार हे अद्याप माहिती नाही. कसं कराल डीलीट फॉर एव्हरीवन? चुकून पाठवलेला मेसेज दर तुम्हाला डीलीट करायचा असेल, तर मेसेज सिलेक्ट करुन डीलीट ऑप्शनवर जा. तिथे गेल्यानंतर तुम्हाला तीन पर्याय येतील. डीलीट फॉर एव्हरीवन, डीलीट फॉर मी आणि कॅन्सल. डीलीट फॉर एव्हरीवन केल्यास समोरच्या व्यक्तीकडील मेसेज डीलीट होईल. तर डीलीट फॉर मी केल्यास फक्त तुमच्या चॅटमधून संबंधित मेसेज डीलीट होईल. तुम्ही मेसेज डीलीट करण्यापूर्वी समोरच्या व्यक्तीने कोट करुन रिप्लाय दिलेला असेल, तर तो मेसेज दिसत राहील.