नवी दिल्ली : भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने आयोजित केलेल्या 5G लिलावात भारती  एअरटेलने बाजी मारली असून कंपनीने एकूण 43,084 कोटी रुपये खर्च करुन 19,867.8 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम खरेदी केले आहेत. यामध्ये 26 GHz आणि 3.5 GHz बँड्सचा संपूर्ण भारतातील फूटप्रिंटचा समावेश आहे. तसेच मिड बँड स्पेक्ट्रम (900 MHz, 1800 MHz, आणि 2100 MHz) मजबूत करत आहे. यासह, एअरटेलने पुढच्या 20 वर्षांसाठी 5G स्पेक्ट्रम खरेदी केलं आहे. 


ग्राहकांना उत्कृष्ट 5G सेवा 
एअरटेलकडे आता देशातील सर्वात विस्तृत असे मोबाइल ब्रॉडबँड फूटप्रिंट आहे. भारतात दूरसंचार क्षेत्रातील 5G क्रांती आणण्यासाठी  कंपनी नेहमीच अग्रस्थानी असेल. वर्षानुवर्षे स्पेक्ट्रम अधिग्रहणाच्या बाबतीत कंपनीने स्मार्ट आणि सातत्यपूर्ण धोरण अवलंबले आहे, परिणामी एअरटेल आज मध्यम आणि लो बँड स्पेक्ट्रमचं सर्वात मोठं माध्यम आहे. या माध्यमातून सर्वोत्तम 5G सेवा प्रदान करण्यासाठी प्रयत्नशील आहे. ऑगस्ट 2022 मध्ये कंपनीची 5G सेवा सुरू होईल आणि  ग्राहकांना 5G कनेक्टिव्हिटीचे पूर्ण लाभ देण्यासाठी जगभरातील सर्वोत्तम तंत्रज्ञान भागीदारांसोबत कंपनी काम करेल. शिवाय, 3.5 GHz आणि 26 GHz बँडमधील प्रचंड क्षमता दूरसंचार प्रदात्याला कमी खर्चात 100X क्षमता निर्माण करण्यास सक्षम करेल.


या अधिग्रहणावर बोलताना, भारती एअरटेलचे एमडी आणि सीईओ, गोपाल विठ्ठल म्हणाले की, “एअरटेल 5G लिलावाच्या निकालाने आनंदित आहोत. आमच्या स्पर्धकाच्या तुलनेत कमी किंमतीत सर्वोत्तम स्पेक्ट्रम खरेदी करण्याच्या सातत्यपूर्ण धोरणाचा हा भाग आहे. चांगल्या सेवेची अपेक्षा करणाऱ्या भारतीय ग्राहकाच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील. आम्हाला खात्री आहे की आम्ही कव्हरेज, वेग आणि लेटन्सीच्या बाबतीत भारतातील सर्वोत्तम 5G अनुभव प्रदान करण्यात सक्षम होऊ. हे आम्हाला आमच्या B2C आणि B2B दोन्ही ग्राहकांसाठी अनेक स्थापित मानकं बदलण्यासाठी प्रयत्नशील राहिल.”


एअरटेलने आता देशातील विविध भागांमध्ये 5G सेवा सुरू करण्याची योजना आखली आहे, ज्याची सुरुवात काही प्रमुख शहरांपासून झाली आहे. टेलको सॅमसंग, नोकिया आणि एरिक्सन - नेटवर्क भागीदार म्हणून भारतभर 5G सेवा वितरीत करण्यासाठी करार करत आहे. ही सेवा या महिन्यात सुरू होण्याची अपेक्षा आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या 5G सक्षम उपकरणांच्या वाढत्या संख्येमुळे आणि परवडणाऱ्या किमतीमुळे ग्राहक 5G तंत्रज्ञानाचा झपाट्याने स्वीकार करतील अशी कंपनीला आशा आहे. 


गेल्या काही वर्षांपासून 5G फर्स्टचा वापर करण्यात एअरटेल आघाडीवर आहे. सन 2018 साली 5G तंत्रज्ञानाची चाचणी घेणारी टेल्को ही भारतातील पहिली कंपनी होती. तेव्हापासून कंपनीने 5G सेवा सुरू करण्यासाठीच्या तयारीसाठी इतर विविध चाचण्या घेतल्या आहेत. गेल्या वर्षी एअरटेलने दिल्ली व्यतिरिक्त देशातील पहिली ग्रामीण 5G चाचणी घेतली. अशा पद्धतीची 700 MHz बँडवर 5G चाचणी घेणारी टेल्को ही पहिली कंपनी होती. 5G कव्हरेज, वेग आणि लेटन्सीच्या बाबतीत भारतातील सर्वोत्तम सेवा प्रदान करू शकू अशी कंपनीने ग्राहकांना खात्री दिली. 


अगदी अलीकडे एअरटेलने BOSCH सुविधेवर भारतातील पहिले खाजगी 5G नेटवर्क सुरू केले आणि देशातील पहिली 5G कनेक्टेड रुग्णवाहिका सुरू करण्यासाठी अपोलो हॉस्पिटलसोबत भागीदारी केली. ब्रँडने एअरटेल 5G कडून सुरू करण्यात आलेल्या ऑनलाइन गेमिंगचा एक डेमो दाखवला होता. या वर्षाच्या सुरुवातीला एअरटेलने एक विशेष 5G इव्हेंट आयोजित केला होता. त्यामध्ये प्रसिद्ध क्रिकेटपटू कपिल देव यांचे 5G पॉवर्ड लाईव्ह होलोग्राममध्ये चित्रण करण्यात आलं होतं.  


या सर्व गोष्टी लक्षात घेता भविष्यात 5G तंत्रज्ञानासाठी अमर्याद संधी असून त्यासाठी एअरटेल कंपनी नेहमीप्रमाणेच आघाडी घेण्यासाठी प्रयत्न करेल.