नवी दिल्ली : देशातील पहिलं 'इंडिया मोबाईल काँग्रेस' संमेलन आजपासून (27 सप्टेंबर) सुरु होत आहे. हे तीन दिवसीय संमेलन 29 सप्टेंबरपर्यंत सुरु असेल.


"मोबाईल, इंटरनेट आणि तंत्रज्ञान यांसाठी सर्वात मोठं व्यासपीठ ठरणाऱ्या 'इंडिया मोबाईल काँग्रेस'चं आयोजन भारतात होत आहे. या संमेलनाचं आयोजन केल्याचा अभिमान वाटतो.", अशा भावना केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा यांनी व्यक्त केल्या.

इंडिया मोबाईल काँग्रेस, सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया (COAI), मोबाईल आणि टेलिकॉम ऑपरेटर्स, तसेच इंटरनेट कंपन्यांच्या संघटनांकडून 'इंडिया मोबाईल काँग्रेस' संमेलनाचं आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाचं नेतृत्त्व केंद्र सरकारचं दूरसंचार विभाग नोडल मंत्रालय म्हणून करत आहे.

मोबाईल, इंटरनेट, कनेक्टिव्हिटी आणि डिजिटल सेवा क्षेत्रातील भारताचा दबदबा किती आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. शिवाय, या सर्व गोष्टींवर या संमेलनात चर्चा होईल, काही प्रॉडक्ट्सचं अनावरण होईल, या क्षेत्राबद्दल माहिती दिली जाईल. एकंदरीत इंडिया मोबाईल काँग्रेसचं तंत्रज्ञान क्षेत्रात आणि डिजिटल इंडियाच्या दृष्टीने अधिक महत्त्व आहे.