मुंबई : ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी इंटरनेट डेटाच्या स्पर्धेत आता आयडियानेही उडी घेतली आहे. रिलायन्स जिओ, व्होडाफोन आणि एअरटेलनंतर आता आयडिया सेल्युलरनेही आपल्या ग्राहकांसाठी एक वर्षापर्यंत मोफत 4G डेटाचा स्पेशळ प्लॅन लॉन्च केला आहे.


मोफत 4G डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉल आणि SMS देणारा टेरिफ प्लॅन बुधवारी आयडियाने लॉन्च केला. याआधी एअरटेल, व्होडाफोनसारख्या टेलिकॉम कंपन्यांनीही टेरिफ प्लॅनची ऑफर लॉन्च केली होती.

ज्या आयडिया ग्राहकांकडे 4G स्मार्टफोन आहे, त्यांना 348 रुपयांच्या पॅकमध्ये 3 जीबी 4G डेटा फ्री मिळेल. याच पॅकमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉल आणि SMS ही मिळतील. नव्या 4G स्मार्टफोनवर या पॅकसोबत रिचार्ज केल्यानंतर 1 जीबी अतिरिक्त 4G डेटा मिळेल. या प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवसच असेल. या प्लॅननुसार ग्राहक एका वर्षाला जास्तीत जास्त 13 वेळा रिचार्ज करु शकतात.

आयडियाचे मुख्य मार्केटिंग ऑफिसर शशी शंकर यांनी याबाबत माहिती दिली की, या नव्या प्लॅनमार्फत 4G चा प्रसार वाढेल आणि आयडियाच्या ग्राहकांना हाय-स्पीड वायरलेस ब्रॉडबँड सर्व्हिसेस घेण्यासाठी प्रोत्साहनही मिळेल.