मुंबई : आयडिया सेल्युलर या टेलिकॉम सर्व्हिस कंपनीने नव्या स्कीमची घोषणा केली आहे. आयडियाच्या ग्राहकांना एकाच किंमतीत 2G, 3G किंवा 4G डेटा मिळणार आहे. एक जीबीहून जास्त डेटाच्या किंमती 2G, 3G आणि 4G डेटासाठी सारख्याच असतील आणि देशभर ही घोषणा लागू होईल, अशी माहिती आयडियाकडून देण्यात आली आहे.


ग्राहकांना सध्या वेगवेगळ्या डेटा पॅकसाठी वेगवेगळे रिचार्ज करावे लागत होते. यावर बोलताना आयडिया सेल्युलरचे मुख्य विपणन अधिकारी शशी शंकर यांनी सांगितले, "आयडियाने आपल्या डेटा किंमतींमध्ये स्पष्टता आणली आहे. जेणेकरुन 2G, 3G आणि 4G  साठी एकच रिचार्जचा अवलंब करता येईल."

सर्वात मोठी सेल्युलर कंपनी बनण्यासाठी आयडिया सेल्युलरने व्होडाफोन इंडिया आणि व्होडाफोन मोबाईल सर्व्हिससोबत विलिनीकरण केलं. आता व्होडाफोन आणि आयडिया या दोन्ही कंपन्या सोबत आल्यानंतर दोन्ही कंपन्यांच्या ग्राहकांची संख्या 39 कोटी 40 लाखांवर गेली आहे.

आता आयडिया सेल्युलरने स्वस्त किंमतीच्या डेटा पॅकची घोषणा केली आहे. ज्यामध्ये 345 रुपयांच्या किंमतीत 14 जीबी 4G डेटा मिळेल आणि अनलिमिटेड कॉलिंगही मिळणार आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवसांची असेल.

आयडियाच्या नव्या प्लॅनमध्ये प्रत्येक दिवसासाठी डेटा लिमिट देण्यात आली अशून, याद्वारे प्रत्येक युजर 500 एमबी प्रत्येक दिवशी वापरु शकतो. मात्र, आयडिया आपल्या मोजक्या ग्राहकांनाच या प्लॅनचा लाभ देत आहे की सर्वांसाठी प्लॅन आहे, हे स्पष्ट नाही.

तुम्ही आयडियाचे युजर असाल आणि तुम्हाला हा प्लॅन हवा असेल, तर तुम्हाला आयडिया अॅप इन्स्टॉल करु त्यावर जाऊन तपासावं लागेल. तिथे तुमच्या नंबरसाठी हा प्लॅन उपलब्ध आहे का, ते कळू शकेल.