मुंबई : एकेकाळी भारतीय बाजारात सॅन्ट्रो कारला बरीच पसंती होती. मात्र, काही वर्षांपूर्वी ह्युंदाईने या कारचं उत्पादन बंद केलं. पण सध्या ह्युंदाई एका नव्या हॅचबॅक कारवर काम करत आहे. त्यामुळे असाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे की, कंपनी या कारला सॅन्ट्रो नाव देण्याची शक्यता आहे.

भारतात ही कार या वर्षी लाँच केली जाऊ शकते. या कारची स्पर्धा मारुती ऑल्टो, डॅटसन रेडी-गो आणि रेनॉल्ट क्विडसोबत असणार आहे.

ह्युंदाईच्या सॅन्ट्रोने भारतीय कार बाजारात बरंच यश संपादन केलं होतं. ही ह्युंदाईची पहिली हॅचबॅक कार होती. या कारसोबतच 1998 साली ह्युंदाईने भारतात एंट्री केली होती. 1998 साली लाँच झालेल्या सॅन्ट्रो कारने 2014 पर्यंत आपली जादू कायम ठेवली होती. 16 वर्षाच्या कालावधीत कंपनीने सॅन्ट्रोच्या तब्बल 16 लाख युनिटची विक्री केली होती. यावेळी या कारची स्पर्धा मारुती सुझुकीच्या ऑल्टो 800 आणि वॅगन आरशी होती.

दरम्यान, ह्युंदाईने ग्रँड आय-10 आणि एलीट आय-20 या कार लाँच केल्यानंतर 2014 साली सॅन्ट्रोचं उत्पादन बंद केलं. पण ग्राहकांकडून या कारविषयी कायमच विचारणा होत असल्याने कंपनी पुन्हा एकदा सॅन् कार लाँच करण्याच्या तयारीत आहे.

ह्युंदाईचे सीईओ वायकेकू यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. नव्या हॅचबॅकसह सॅन्ट्रो कार पुन्हा बाजारात आणण्याचा विचार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

बातमी सौजन्य : cardekho.com