History of Twitter : गेल्या कित्येक दिवसांपासून ट्विटर डीलमुळे (Twitter Deal) चर्चेत असणाऱ्या एलन मस्क (Elon Musk) यांनी अखेर ट्विटरची (Twitter) मालकी आपल्या नावे केली. त्यानंतर ट्विटरचे तत्कालीन सीईओ पराग अग्रवाल (Parag Agrawal) आणि इतर उच्च अधिकारी पायऊतार झाले. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे एलन मस्क आपल्या मिश्किल स्वभावासाठी ओळखले जातात. ट्विटरची डील पूर्ण होण्यापूर्वी बुधवारी एलन मस्क एक बाथरुम सिंक (bathroom sink) घेऊन ट्विटर हेडक्वॉर्टर्समध्ये (Twitter Headquarters) पोहोचले होते. पण तुम्हाला माहीत आहे, एलन मस्क यांनी खरेदी केलेल्या ट्विटरची सुरुवात कधी आणि कशी झाली? किवा सध्या एका ट्वीटनं संपूर्ण जगात खळबळ माजवणाऱ्या ट्विटरवरील सर्वात पहिलं ट्वीट कोणतं होतं? 


मार्च 2006 मध्ये जॅक डोर्सी, नोहा ग्लास, बिझ स्टोन आणि इव्हान विल्यम्स यांनी ट्विटर तयार केलं. त्यानंतर काही चाचण्या केल्यानंतर त्यांनी जुलै 2006 मध्ये ट्विटर लॉन्च केलं. सुरुवातीला त्यांनी एकमेकांमध्ये म्हणजेच, ओळखीच्या लोकांना ट्वीट केलं. सध्याच्या TWITTER चं पूर्वीचं स्पेलिंग Twttr.com असं होतं. सहा महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर Twitter.com सर्वांसमोर आलं. ट्विटरचं स्पेलिंग बदलण्यामागील कारण म्हणजे, या दोन्ही शब्दांचा अर्थ. सुरुवातीला असणाऱ्या Twttr चा अर्थ होतो की, गॉसिपिंग किंवा चर्चा करणं. पण फाऊडर्सपैकी एक असणाऱ्या जॅकला या अर्थाऐवजी 'किलबिलाट' असा अर्थ हवा होता. हा अर्थ त्यांना twitter या स्पेलिंगमध्ये गवसला. त्यामुळे Twttr चं स्पेलिंग बदलून Twitter असं करण्यात आलं. आणि तेव्हापासून आतापर्यंत TWITTER.COM चा प्रवास सुरु आहे. 


आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की ट्विटरवरचं पहिलं ट्वीट काय असेल? ट्विटरवर पहिलं ट्वीट ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी यांनी केलं होतं. त्यांनी हे ट्वीट 22 मार्च 2006 रोजी केलं होतं. हे ट्वीट आजही ट्विटरवर आहे. डोर्सी यांनी भारतीय वेळेनुसार, दुपारी 2 वाजून 20 मिनिटांनी ट्वीट केलं होतं. मात्र, आता हे ट्वीट विकलं गेलं आहे. काही दिवसांपूर्वी या ट्वीटचा लिलाव करण्यात आला. हे ट्वीट मोठ्या रकमेला विकण्यात आलं. 2006 साली केलेल्या या ट्वीटमध्ये ट्विटरच्या लॉन्चची घोषणा करण्यात आली होती. त्यावर 'जस्ट सेटिंग अप माय ट्विटर' (Just Setting Up My Twttr) असं लिहिलं होतं.


जेव्हा अवकाशातून ट्वीट करण्यात आलं...


22 जानेवारी 2010 ट्विटर अवकाशातही सक्रिय झालं. या दिवशी नासाचे अंतराळवीर टी.जे. क्रीमर यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून पहिला विनाअनुदानित ऑफ-अर्थ ट्विटर संदेश पोस्ट केला होता. नोव्हेंबर 2010 च्या अखेरीस, @NASA_Astronauts या अंतराळवीरांच्या खात्यावर दररोज सरासरी डझनभर अपडेट्स पोस्ट करण्यात आल्या.