मुंबई: देशातील सर्वात मोठी इंटरनेट कंपनी हाइक मेसेंजरनं आतापर्यंत 17.5 कोटी डॉलर म्हणजेच 1150 कोटी रुपयांची कमाई केली असल्याची घोषणा केली आहे. तसेच यामुळे कंपनीचं मूल्य 1.4 अब्ज डॉलर (9300 कोटी रु.)  एवढं झालं आहे.

 

टेलिकॉम बाजारातील नामांकित कंपनी भारती एअरटेलचे चेअरमन सुनील भारती मित्तल यांचा मुलगा कविन मित्तल याने हाईक मेसेंजर तयार केलं आहे. अवघ्या 3 वर्ष झालेल्या या कंपनीमध्ये सॉफ्टबँक, टायगर आणि भारतीसारख्या गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवले आहेत. तर आता टेनसेट होल्डिंग आणि फॉक्सकॉननं साडे सतरा कोटी डॉलरची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या पैशाचा वापर आपण कंपनीचा विस्तार वाढविण्यासाठी करणार असल्याचं कविनचं म्हणणं आहे.

 

व्हॉटसअॅप प्रमाणेच हाइक मोफत मेसेजिंग सेवा देते. हाइकची खास बात म्हणजे, इंटरनेट किंवा डेटा पॅकशिवायही मेसेज पाठवता येतात.
कंपनीचा दावा आहे की, हाइक यूजर्सची संख्या आता 10 कोटी एवढी झाली आहे. एका महिन्यात 40 अब्ज मेसेज पाठवले जातात.

 

या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या सॉफ्टबँकेचे चेअरमन आणि सीईओ मासायोशी सोन यांचं म्हणणं आहे की, त्यांनी ज्या भारतीय कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे त्यापैकी हाइक सर्वात चांगलं प्रदर्शन करणारी कंपनी आहे. त्यामुळेच सॉफ्टबँकेने आतापर्यंत ही गुंतवणूक कायम ठेवली आहे.