अहमदाबाद : गुजरातमध्ये पाटीदार आंदोलनावेळी इंटरनेट सेवा ठप्प झाल्यामुळे अंजना ब्रम्हभट या महिलेने एअरटेलकडून 44.50 रुपये परत मागितले. कंपनीने पैसे द्यायला नकार दिला आणि अंजना ब्रम्हभट यांनी थेट कोर्टाचे दरवाजे ठोठावले. या कोर्टाच्या लढाईत अंजना यांचा विजय झाला.

अंजना यांनी 5 ऑगस्ट 2015 रोजी 178 रुपयांमध्ये 28 दिवसांच्या व्हॅलिडीटीचा 2GB डेटा पॅक घेतला. आंदोलनामुळे शहरातील इंटरनेट सेवा 26 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2015 या काळात खंडित करण्यात आली होती. त्यामुळे आठ दिवसांची व्हॅलिडीटी वाढवून द्या किंवा 44.50 रुपये रिफंड करा, अशी मागणी अंजना यांनी केली. मात्र कंपनीने याला स्पष्टपणे नकार दिला.

अंजना यांनी मानसिक त्रास झाल्यामुळे 10 हजार रुपये नुकसान भरपाई आणि कायदेशीर खर्चासाठी 5 हजार रुपयांचा दावा केला. मात्र इंटरनेट सेवा सार्वजनिक कारणांसाठी बंद करण्यात आली होती. त्यामुळे ही नुकसान भरपाई दिली जाऊ शकत नाही, असं ग्राहक न्यायालयाने स्पष्ट केलं. दरम्यान 44.50 रुपयांवर 12 टक्के व्याजासह 55.18 रुपये देण्याचा आदेश ग्राहक न्यायालयाने दिला.