गुगलच्या I/O 2019 या डेव्हलपर्स कॉन्फरन्समध्ये पिक्सल सिरीजचे दोन नवे फोन लाँच करण्यात आले आहेत. Pixel 3a, Pixel 3a XL हे दोन नवे स्मार्टफोन यावेळी लाँच करण्यात आले. गुगल पिक्सल सिरीजमधील हे आतापर्यंतचे सर्वात स्वस्त फोन आहेत. यापूर्वी लाँच झालेल्या पिक्सल 3 ची किंमत 71,000 रुपये होती तर पिक्सल 3 XL ची किंमत 92,000 रुपये इतकी होती. भारतात Pixel 3a  ची किंमत 39,999 रुपये तर Pixel 3a XL  ची किंमत 44,999 रुपये असणार आहे.


Pixel 3a ची स्क्रीन 5.6 इंचाची आहे. यामध्ये स्नॅपड्रॅगन 670 प्रोसेसर वापरण्यात आला असून 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. या फोनमध्ये 3000 mAH क्षमतेची बॅटरी तसेच 12 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनची बॅटरी पूर्ण चार्ज केल्यास 30 तासांपर्यंत चालू शकते. तसेच 15 मिनिटे चार्ज केल्यास हा फोन 7 तास चालेल असा दावा कंपनीने केला आहे.

पिक्सल 3 a XL मध्ये 6 इंचाची एचडी ओएलईडी स्क्रीन देण्यात आली आहे. तसेच स्क्रीनच्या सुरक्षेसाठी ड्रॅगन ट्रायल ग्लास देण्यात आला आहे. तसेच 3700 mAH क्षमतेची बॅटरी वापरण्यात आली आहे. या दोनही फोनला लवकरच गुगलची लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टीम Android Q चे अपडेट देण्यात येणार आहे.

Pixel 3a आणि Pixel 3a XL या दोनही फोनच्या कॅमेऱ्याबाबत अनेकांना उत्सूकता आहे. दोन्ही फोनमध्ये 12.2 मेगापिक्सलचा ड्युअल पिक्सल सोनी IMX363 सेंसर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच नाइट साइट, पोर्ट्रेट मोड सारखे फिचर्सही देण्यात आले आहेत.

15 मेपासून हा फोन फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. या फोनची प्री-बुकिंग आजपासून फ्लिपकार्टवर सुरु झाली आहे. विशेष म्हणजे वनप्लस 7 या नव्या प्रिमियम मोबाईल फोनचं 14 मे ला लाँचिंग होणार आहे.