मुंबई : इंटरनेट जगतातील जायंट सर्च इंजिन गूगलने जगप्रसिद्ध भारतीय चित्रकार जामिनी रॉय यांना सलाम केला आहे. जामिनी रॉय यांची आज 130 वी जयंती आहे. याचंच निमित्त साधत गूगलने जामिनी रॉय यांच्या कलेतून साकारलेलं चित्राचं डूडल तयार करुन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.
विसाव्या शतकातील आधुनिक भारतीय चित्रकारांमध्ये जामिनी रॉय यांचं नाव अव्वल स्थानी आहे. देशाच्या सीमा ओलांडून जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या मोजक्या भारतीय चित्रकारांमध्ये रॉय यांची गणना होते.
चित्रकलेतील मोलाच्या योगदानाची दखल घेत, भारत सरकारने 1955 साली जामिनी रॉय यांचा ‘पद्मभूषण’ पुरस्काराने गौरव केला.
फोटो सौजन्य : विकिपीडिया
जामिनी रॉय यांचा अल्पपरिचय :
पश्चिम बंगालमधील बंकुरा जिल्ह्यातील बोलियातोर नावाच्या खेड्यात जामिनी रॉय यांचा 11 एप्रिल 1887 रोजी जन्म झाला.
1903 मध्ये वयाच्या 16 व्या वर्षी त्यांनी कोलकात्याच्या गव्हर्नमेंट स्कूल ऑफ आर्ट्समध्ये चित्रकलेचं शिक्षण घेण्यास सुरुवात केली. ग्रामीण जीवन जवळून पाहिलेल्या रॉय यांनी त्यांच्या चित्रांमध्येही त्याचं प्रतिबिंब पाहायला मिळालं. वयाच्या 85 व्या वर्षी 24 एप्रिल 1972 रोजी जामिनी रॉय यांचं निधन झालं.
गूगल आपल्या डूडलद्वारे नेहमीच जगातल्या महत्त्वाच्या व्यक्तींना आदरांजली वाहत असतं. दिग्गजांच्या कार्याचा गौरव करत असतं. जामिनी रॉय यांचं डूडल करुन गूगलने भारतीय चित्रकलेला अनोख्या पद्धतीने सलाम केला आहे.