न्यूयॉर्क : अँड्रॉईड 'ओ' 8.0 चं अखेर नामकरण करण्यात आलं आहे. जगातील नंबर वन ऑपरेटिंग सिस्टम असलेल्या अँड्रॉईडचं पुढचं व्हर्जन 'ओरिओ' या नावाने ओळखलं जाणार आहे. हे सर्वात वेगवान आणि स्मार्ट व्हर्जन असेल, असं गुगलने म्हटलं आहे.
अँड्रॉइडच्या 'ओ' आवृत्तीचे सर्व फीचर्स आधीच जाहीर करण्यात आले होते, मात्र त्याचं नाव अद्याप जाहीर न झाल्याने अँड्रॉईड यूझर्समध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता होती. अखेर ओरिओ या नामकरणामुळे सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. बॅटरी लाईफ, स्पीड आणि सिक्युरिटी या तीन गोष्टींवर नव्या आवृत्तीत भर देण्यात आला आहे.
वर्षाच्या सुरुवातीलाच अँड्रॉइड 'ओ'चा पहिला प्रिव्ह्यू सादर करण्यात आला होता. यानंतर मे महिन्यात झालेल्या
गुगलच्या परिषदेत या प्रणालीचं सादरीकरण करण्यात आलं. गुगल पिक्सल फोन, गुगल पिक्सल एक्सएल, गुगल पिक्सल सी, गुगल नेक्सस 6 पी, गुगल नेक्सस 5 एक्स आणि नेक्सस प्लेअर या मॉडेल्समध्येच ही प्रणाली वापरता येत होती.
ओरिओ म्हणजे काय?
ओरिओ हे एक बिस्कीट असून यात चॉकलेटच्या दोन चीप्समध्ये क्रीम भरलेलं असतं. जगातल्या बहुतांश देशांमध्ये ओरिओ हा ब्रँड प्रसिद्ध आहे.
स्वीट्सच्या नावांची परंपरा
अँड्रॉइड प्रणालीच्या विविध आवृत्त्यांना आजवर जगाच्या विविध भागात लोकप्रिय असणारे गोड पदार्थ, चॉकलेट्स, डेझर्टस् यांची नावे देण्यात आली आहेत. यात इंग्रजी अल्फाबेटनुसार पहिल्या दोन आवृत्तींना अल्फा आणि बीटा ही नाव देण्यात आली. त्यानंतर सी पासून कपकेक (1.5), डोनट (1.6), इक्लेअर्स (2.0, 2.1), फ्रोयो (2.2, 2.2.3), जिंजरब्रेड (2.3, 2.3.7), हनीकोंब (3.0 आणि 3.2.6), आईस्क्रिम सँडविच (4.0, 4.0.4), जेली बीन (4.1, 4.3.1), किटकॅट (4.4, 4.4.4 आणि 4.4W, 4W.2), लॉलिपॉप (5.0 आणि 5.1), मार्शमेलो (6.0) आणि नोगट (7.0). आता अँड्रॉइड ओ म्हणजेच 8.0 ही आवृत्ती ओरिओ या नावाने ओळखली जाणार आहे.