नवी दिल्ली : गूगल अॅलोने ग्राहकांना आणखी आकर्षित करण्यासाठी असिस्टंट या लोकप्रिय फीचरमध्ये हिंदी भाषेचा समावेश करणार असल्याची घोषणा केली आहे. येत्या दोन ते तीन दिवसात अँड्रॉईड आणि आयफोन यूझर्ससाठी हे फीचर उपलब्ध होणार असल्याचं कंपनीने जाहीर केलं आहे.


मेसेजिंग अॅप अॅलोच्या हिंदी भाषेच्या पर्यायासाठी अपडेट करावी लागणार आहे. गूगल अॅलोचे सर्वाधिक यूझर्स असणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे. त्यामुळे युझर्सना हिंदी भाषेचा पर्याय देऊन गूगलने व्हॉट्सअॅपला चांगलीच टक्कर दिली असल्याचं बोललं जातंय.

गूगल अॅलोमध्ये असिस्टंट फीचरचा वापर सर्व प्रकारची मदत मिळवण्यासाठी केला जातो. अॅप वापरताना कुठलीही अडचण आल्यास असिस्टंटद्वारे मदत मिळवता येते.

मात्र सध्या ही मदत मिळण्यासाठी केवळ इंग्रजीमध्ये बोलावं लागतं. पण इंग्रजी येत नसणारे अनेक ग्राहक आहेत, त्यामुळे हे फीचर उपयोगी येईल, असं कंपनीने म्हटलं आहे.