मुंबई : जनरल मोटर्स कंपनीने भारतात वाहनविक्री थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे कंपनीचा भर निर्यातीवर असेल, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. 2017 च्या अखेरपर्यंत जनरल मोटर्स भारतातील कारची विक्री थांबवण्यात येईल.

विक्रीच्या बाबतीत कोणे एके काळी जनरल मोटर्स पहिल्या क्रमांकाची कंपनी होती. मात्र फायदेशीर न ठरणाऱ्या अनेक बाजारपेठांमधून जनरल मोटर्सने मागे हटण्याचा निर्णय घेतल्याचं मुख्य कार्यकारी अधिकारी मेरी बरा यांनी सांगितलं.

जनरल मोटर्सची मुख्य स्पर्धा टोयोटा मोटर, फोक्सवॅगन, रेनॉल्ट-निसान यासारख्या वाहन व्यवसायातील दिग्गज कंपन्यांशी आहे. भारत हा वाहन उद्योगविश्वात दुसऱ्या क्रमांकाचा देश मानला जातो. विशेष म्हणजे भारताबाहेर विक्रीसाठी भारतातील वाहनांचं उत्पादन सुरु राहणार आहे.

शेवरोले, ओपेल यासारखे जनरल मोटर्सचे विख्यात ब्रँड्स आहेत. चीन आणि ब्राझील या उदयोन्मुख बाजारपेठांतील गुंतवणुकीकडे 'जीएम'चं प्रामुख्याने लक्ष आहे. दरवर्षी नव्या लाखो ग्राहकांची भर पडत असल्याने भारतात कारविक्री कठीण असल्याचं मत जनरल मोटर्सने व्यक्त केलं आहे.

भारतासोबतच दक्षिण आफ्रिकेतूनही जनरल मोटर्स काढता पाय घेत आहे. 2015 मध्ये जीएमने रशियाला रामराम ठोकला होता.