मुंबई : व्हॉट्सअॅपवर अनेकदा आपण एखादा मेसेज, फोटो किंवा व्हीडिओ नजरचुकीनं दुसऱ्याच व्यक्तीला किंवा ग्रुपमध्ये सेंड करतो. अशावेळी आपली बरीच गोची होते. त्यामुळे अशी चूक घडल्यानंतर मेसेज डिलीट किंवा अनसेंड करण्याचं एखादं फीचर असावं अशी मागणी अनेक यूजर्सनं व्हॉट्सअॅपनं केली होती. व्हॉट्सअॅप देखील या फीचरवर गेले अनेक दिवस काम करत होतं. अखेर कालपासून व्हॉट्सअॅपनं 'रिकॉल' हे फीचर रोलआउट करणं सुरु केलं आहे.

या फीचरमुळे एकदा सेंड केलेला मेसेज अनसेंड करता येणार आहे. ‘व्हॉट्सअॅप बिटा इन्फोने' हे फीचर रोलआउट झाल्याची माहिती दिली आहे. हे फीचर अँड्रॉईड, आयओएस, विंडोज या सर्व प्लॅटफॉर्मवर रोलआऊट होणं सुरु झालं आहे.

मात्र, यूजर्स तेच चॅट किवा मेसेज रिकॉल करु शकेल ज्यामध्ये दोन्ही बाजूकडील व्हॉट्सअॅप हे अपडेट झालेलं असेल. म्हणजेच, तुम्ही एखाद्या व्यक्तीला चुकून मेसेज सेंड केला पण तो तुम्हाला अनसेंड करायचा असल्यास तुमचं आणि त्या व्यक्तीचं व्हॉट्सअॅप अपडेट झालेलं असणं गरजेचं आहे.

यूजर्स फक्त टेक्स्ट मेसेजच नाही तर GIF,फोटो, व्हॉईस मेसेज देखील अनसेंड करु शकतात. मेसेज पाठवल्यानंतर पुढच्या सात मिनिटात यूजर्सला मेसेज अनसेंड करता येईल. 7 मिनिटानंतर यूजर आपला मेसेज रिकॉल करु शकत नाही. पण समोरच्या व्यक्तीने तुमचा मेसेज लगेच वाचला तर मात्र युजरकडे मेसेज रिकॉल करण्याचा पर्याय नसेल.