FAU-G Game : लोकप्रिय मोबाईल गेम PUBG भारतात बॅन केल्यानंतर पब्जी प्रेमींमध्ये निराशा पसरली होती. परंतु, अशातच अभिनेता अक्षय कुमारने पब्जी सारखाच भारतीय गेम FAU-G ची घोषणा केली होती. आज हा गेम लॉन्च करण्यात येणार आहे. यासंदर्भातील एक व्हिडीओ अक्षय कुमारने ट्विटरवर शेअर केला आहे. अक्षयने हा व्हिडीओ शेअर करत एक कॅप्शनही लिहिलं आहे. अक्षय कुमारने लिहिलं आहे की, "दुश्मनचा सामना करा, आपल्या देशासाठी लढा. भारताचा सर्वात अॅन्टीसिपेटेड अॅक्शन गेम Fearless and United Guards FAU-G.आजपासूनच तुमचं मिशन सुरु करा."


गलवान खोऱ्याचा उल्लेख


या व्हिडीओमध्ये गलवान खोऱ्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये दाखवण्यात आलं आहे की, गलवान खोऱ्यात देशाचा झेंडा गायब होतो. त्यानंतर देशाचे जवान आणि शत्रूमध्ये हिंसक झडप झाल्यातं पाहायला मिळतं. भूस्खलनामुळे कोसळलेल्या दरडीमुळे अनेक जवान जखमी होतात. यामध्ये एक लेफ्टनंट गंभीर जखमी होतात. यामध्ये एक जवान म्हणतो की, भारतीय सैन्य न लढता कधीच हार मानत नाही आणि भारतीय फौजी कधीच मागे हटत नाही. शेवटी व्हिडीओमध्ये ऐकू येतंयत की, शौर्य, बंधुता आणि भारतासाठी FAU-G.





लॉन्च होण्यापूर्वीच 40 लाखांहून अधिक प्री-रजिस्ट्रेशन


FAU-G ला बॅन करण्यात आलेला मोबाईल गेम, PUBG Mobile चा पर्याय म्हणून पाहिलं जात आहे. खास गोष्ट म्हणजे, या गेमसाठी लॉन्च होण्यापूर्वीच 40 लाखांहून अधिक प्री-रजिस्ट्रेशन करण्यात आले आहेत. FAU-G चे डेव्हलपर्स nCore ने यासंदर्भातील माहिती शेअर केली. दरम्यान, या गेमचं प्री-रजिस्ट्रेशन गेल्या वर्षी नोव्हेंबरच्या अखेरिस सुरु करण्यात आलं होतं.


कमाईतील काही वाटा भारताच्या वीर ट्रस्टला दान करणार


अक्षय कुमारने काही दिवसांपूर्वी या गेमची घोषणा केली होती. त्यावेळी अक्षय कुमारने म्हटलं होतं की, "पंतप्रधान मोदींच्या आत्मनिर्भर अभियानाला पाठिंबा म्हणून हा अॅक्शन गेम सादर करताना मला अतिशय अभिमान वाटत आहे. निडर आणि एकतेचं प्रतिक गार्ड्स - फौजी. मनोरंजनातून खेळाडूंना आपल्या सैनिकांचा त्याग समजण्यास मदत होईल. या मोबाईल गेममधून मिळणाऱ्या महसुलाचा 20 टक्के वाटा भारताच्या वीर ट्रस्टला दान केला जाणार आहे."


असा करा गेम डाऊनलोड




  • फौ-जी गेम लॉन्च झाल्यानंतर युजर्ससाठी हा गेम प्ले स्टोअरवर उपलब्ध होईल.

  • त्याचसोबत हा गेम ऑफिशिअल साईटवरुनही डाऊनलोड करता येईल.

  • सध्या फौ-जी गेमची ऑफिशिअल वेबसाइट लॉन्च झालेली नाही. तसेच गेमबाबत सर्व माहिती गेमचे प्रमोटर्स nCore गेम्स मार्फत देण्यात येत आहे.