मुंबई :  अमेरिकेतील प्रसिद्ध लाईफस्टाईल आणि फुटवेअर ब्रॅण्ड ‘स्केचर्स’ने फ्लिपकार्टवरुन बनावट बुटांची विक्री होत असल्याचा दावा केला आहे. तसेच कंपनीने फ्लिपकार्टसह त्याच्या प्लॅटफॉर्मवरुन विविध वस्तूंची विक्री करणाऱ्या कंपन्यांविरोधात दिल्ली हायकोर्टात कोर्टात याचिका दाखल केली आहे.


इकॉनॉमिक्स टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, फ्लिपकार्टद्वारे भारतात ऑनलाईन सामानांची विक्री वाढल्यानंतर, अशाप्रकारच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. त्यातच आता अमेरिकेतील प्रसिद्ध स्केचर्सच्या याचिकेनंतर कोर्टाने नियुक्त केलेल्या स्थानिक कमिशनरांच्या मदतीने दिल्ली आणि अहमदाबादमधील एकूण सात गोदामांवर छापे टाकण्यात आले.

या छापेमारीत तब्बल 15 हजार बनावट बुट जप्त करण्यात आले. विशेष म्हणजे. यातील बहुतांश बुट हे स्केचर्स ब्रॅण्डच्या नावावर फ्लिपकार्टवरुन विकले जात होते. याप्रकरणी अजून काही गोदामांवर छापे टाकण्याची अवश्यता असल्याचं कंपनीने दिल्ली हायकोर्टात सांगितलं.

या कारवाईनंतर कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितलं की, “फ्लिपकार्ट ऑनलाईन मार्केटप्लेस आहे. जे विक्रेत्यांना देशभरातील ग्राहकांशी जोडते. आम्ही इंटरमीडियरीच्या स्वरुपात काम करतो. आम्ही आमचा व्यावसाय आतिशय इमानदारीनं आणि कायद्याच्या चौकटीत राहूनच करतो. सध्या या प्रकरणावर आम्ही काहीच प्रतिक्रिया देऊ शकत नाही. कारण हे प्रकरण सध्या कोर्टात न्यायप्रविष्ट आहे.”

दरम्यान, कंपनीच्या सेलर्स लिस्टमध्ये जवळपास एक लाखापेक्षा जास्त विक्रेत्यांनी आपली नोंदणी केली आहे. यातील बनावट वस्तू विकणाऱ्या अनेक विक्रेत्यांना कंपनीने ब्लॅकलिस्टेड केलं आहे. पण तरीही बनावट वस्तूंची विक्री अद्याप सुरु आहे. त्यामुळे याबाबतचे कायदे अधिकाधिक कडक करण्याची गरज असल्याची मागणी तज्ज्ञांकडून होत आहे.