मार्क झुकरबर्गला 'फेसबुक' अध्यक्षपदावरुन हटवण्याची मागणी
एबीपी माझा वेब टीम | 18 Oct 2018 12:21 PM (IST)
अनेक हाय प्रोफाईल घोटाळे समोर आल्यानंतर झुकरबर्गला पदावरुन काढून टाकण्याची मागणी जोर धरत आहे.
मुंबई : 'फेसबुक' या लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईटचा सहसंस्थापक मार्क झुकरबर्गला अध्यक्षपदावरुन हटवण्याची मागणी केली जात आहे. 'फेसबुक इंक'च्या चार मोठ्या अमेरिकन भागीदारांनी सीईओ झुकरबर्गला चेअरमनपदावरुन हटवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. अनेक हाय प्रोफाईल घोटाळे समोर आल्यानंतर झुकरबर्गला पदावरुन काढून टाकण्याची मागणी जोर धरत आहे. इलियॉनिस, ऱ्होड आयलंड, पेन्सिवेनिया आणि न्यू यॉर्क सिटी कंप्ट्रोलर स्कॉट स्ट्रिंगरने एकत्रितपणे हा प्रस्ताव ठेवला आहे. अशाप्रकारचा प्रस्ताव 2017 मध्ये धुडकावण्यात आला होता. खरं तर झुकरबर्गकडे फेसबुकचे सर्वाधिक शेअर्स आहेत. कंपनीने एप्रिल महिन्यात शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार झुकरबर्गकडे 60 टक्के समभाग आहेत. 'केम्ब्रिज अॅनालिटिका' नावाच्या कंपनीने गेल्या वेळच्या अमेरिकन अध्यक्षांच्या निवडणुकीच्या वेळी फेसबुकचा डेटा वापरला होता. ही गोष्ट प्रकाशझोतात आल्यानंतर जगभरात खळबळ उडाली होती. त्यानंतर फेसबुकने 8.7 कोटी यूजर्सचा डेटा 'केम्ब्रिज अॅनालिटिका'ला शेअर केल्याची कबुली दिली होती. भारत सरकारनेही कंपनीला नोटीस पाठवली होती.