सॅन फ्रान्सिस्को: 'फेसबुक हे फक्त श्रीमंतांसाठी नाही, तर प्रत्येक व्यक्तीसाठी आहे.' असं वक्तव्य 'फेसबुक'चा संस्थापक मार्क झुकरबर्गनं केलं आहे. फेसबुकच्या वार्षिक एफ 8 डेव्हलपर बैठकीत तो बोलत होता.

काही दिवसापूर्वी स्नॅपचॅटचा मुख्य कार्यकारी अधिकारी इव्हान स्पीजेलनं भारत 'गरीब देश' असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्याच्या या वक्तव्याला झुकरबर्गनं  उत्तर दिल्याची सध्या चर्चा आहे.

झुकरबर्ग म्हणाला की, 'ज्या पद्धतीनं आम्ही समाजातील प्रत्येक वर्गाला सेवा देतो तेव्हा आम्ही अनेक गोष्टी लक्षात ठेवतो. उदाहरणार्थ फेसबुक लाइट. ज्या देशात इंटरनेट स्पीड कमी आहे त्या देशासाठी आम्ही फेसबुक लाइट तयार केलं आहे. त्यामुळे फेसबुक एका वर्षाच्या आत 20 कोटी लोकांपर्यंत पोहचलं आहे.'

स्पीजेलच्या वक्तव्यानंतर नेटीझन्सनं स्नॅपचॅट आणि आणि स्पीजेलला बरंच ट्रोल केलं होतं. सोशल मीडियातून स्नॅपचॅटवर बरीच टीका करण्यात आली. याचा परिणाम स्नॅपचॅटच्या रेटिंगवर देखील पाहायला मिळाला. स्नॅपचॅटचं रेटिंग पाच स्टारहून थेट एक स्टारवर आलं.