अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात फेसबुक अकाऊंट हॅकिंगचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, दोन दिवसात दोन हॅकिंगचे प्रकार घडले आहेत. सायबर क्राईमने तातडीने कारवाई करत, दोन्ही घटनांमधील आरोपींना गजाआड केले आहे.


घटना पहिली

संगमनेरच्या ललित ओझा यांचं  फेसबुक अकाऊंट हॅक करण्यात आलं होतं. फेसबुकवर दोन मुलींचे फोटो पोस्ट केले होते. या प्रकरणी ओझा यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार केली होती.

सायबर विभागाच्या तपासात अकाश  गुंजाळने फेसबुक हॅक केल्याचं आढळून आले.

विशेष म्हणजे, पीडित ललित ओझा आणि आरोपी आकाश गुंजाळ हे दोघेही एकाच गावातील असून एकमेकांना ओळखतात. ओझा हा त्रास देत असल्याने त्याला धडा शिकवण्यासाठी हॅक केल्याचं गुंजाळने म्हटले आहे. या प्रकरणी गुंजाळला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली.

घटना दुसरी

दुसर्‍या घटनेतही फेसबुक हॅक करुन गैरवापर करण्यात आला. कर्जतच्या प्रदीप विटेवर यांचा फोटो वापरुन गैरवापर केला. साईनाथ वेताळने त्यांचा फोटो वापरुन बनावट अकाऊंट काढलं होतं . त्या अकाऊंटवर त्याने दोन मुलींचे फोटो आणि मोबाईल नंबर टाकला होता.

पीडित प्रदीप विटेवर आणि आरोपी नामदेव वेताळ (वय - 29 वर्षे) हे दोघे एकमेकांचे नातेवाईक आहेत. वैयक्तिक वादातून विटेवर यांना त्रास देण्यासाठी नामदेव वेताळने फेसबुकचा गैरवापर केला. वेताळ शिरुर तालुक्यातील म्हसे बुद्रुकचा रहिवाशी आहे.

सायबर पोलिसांचं आवाहन

या प्रकरणी सायबर पोलिसांनी सोशल मीडियाचा वापर करताना सावधानता बाळगण्याचं आवाहन केलं आहे. फेसबुकचा पासवर्ड 8 डिजिट असणारा ठेवावा, पासवर्ड नावाशी साधर्म्य असणारे टाकू नये. त्याचबरोबर पासवर्ड सेव्ह न करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.