मुंबई : फेसबुकने जुन्या वस्तू खरेदी करण्यासाठी आणि विकण्यासाठी मार्केटप्लेस हे नवं फीचर आणलं आहे. मुंबईत या फीचरची सध्या चाचणी सुरु आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास संपूर्ण भारतात हे फीचर दिलं जाणार आहे. ज्याद्वारे तुम्ही तुमच्या वापरलेल्या चांगल्या वस्तू विकू शकता.

Olx आणि Quickr प्रमाणे फेसबुक युझर्स आता या फीचरचा वापर करु शकतात. अमेरिकेसह 25 देशांमध्ये हे फीचर अगोदरपासूनच सुरु आहे. ज्यापैकी 17 देशांमध्ये हे फीचर नुकतंच रोल आऊट करण्यात आलं. यामध्ये जर्मनी, फ्रान्स आणि इंग्लंड यांचा समावेश आहे.

फेसबुक अॅपमध्ये युझर्सना शॉप हे आयकॉन दिसेल. यामध्ये तुम्हाला जी वस्तू विकायची आहे, त्याचा फोटो अपलोड करावा लागेल. ग्राहक तुम्हाला फेसबुकच्या माध्यमातून संपर्क साधतील आणि पुढचा तपशील घेतील.

कोणतेही पेमेंट्स फेसबुकच्या माध्यमातून होणार नाहीत, असं कंपनीने अगोदरच स्पष्ट केलं आहे.  जुन्या वस्तूंच्या खरेदी-विक्रीसाठी Olx हा आतापर्यंतचा प्रसिद्ध मार्ग होता. मात्र फेसबुकवर ग्राहकांना विक्रेत्याची प्रोफाईलही पाहता येणार आहे, हा सर्वात मोठा फायदा असेल. शिवाय फेसबुकचे युझर्सही मोठ्य प्रमाणात असल्याने हे फीचर कसं काम करतं ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.