मुंबई: लोकप्रिय सोशल नेटवर्किंग वेबसाईट फेसबुकने मोठी चूक केली आहे. फेसबुकने तांत्रिक बिघाडामुळे चुकून आपल्याच 22 विभागातील सुमारे 1 हजार कर्मचाऱ्यांची माहिती संशयित दहशतवाद्यांना लीक केली आहे.
दहशतवाद्यांचा प्रचार-प्रसार आणि अश्लिल पोस्ट रोखण्यासाठी हे कर्मचारी (मॉडरेटर) काम करतात, मात्र फेसबुक सॉफ्टवेअरमध्ये असलेल्या बगमुळे या कर्मचाऱ्यांचीच माहिती लीक झाली.
ज्या कर्मचाऱ्याने संशयित दहशतवाद्याला फेसबुकवरुन बॅन केलं, त्याच कर्मचाऱ्यांची माहिती त्या-त्या व्यक्तीला म्हणजेच संशयित दहशतवाद्यांना आणि दहशतवादी संघटनांना पोहोचली.
या सर्वप्रकारामुळे भयभीत झालेल्या एका कर्मचाऱ्याने थेट कंपनीलाचा रामराम ठोकला आहे.
यापूर्वी आलेला तांत्रिक बिघाड फेसबुकने नोव्हेंबर महिन्यातच दुरुस्त केला होता. मात्र तो बिघाड कायम राहिल्याने हा सर्व प्रकार घडला.
सध्या वाढत्या दहशतवादाला आळा घालण्यासाठी आणि त्याबाबतच्या पोस्टवर नजर ठेवण्यासाठी फेसबुकने खास सुविधा आणली आहे. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या, दहशवादी, किंवा भावना भडकवणाऱ्या पोस्ट फेसबुककडून स्वत: डिलीट केल्या जाणार आहेत.
त्याबाबतच्या तंत्रज्ञानादरम्यानच फेसबुककडून कर्मचाऱ्यांची माहिती लीक झाली.
दरम्यान, फेसबुकनेही अशी चूक झाल्याचं मान्य केलं. यापुढे असा प्रकार टाळण्यासाठी तांत्रिक बदल करु, असं स्पष्टीकरण फेसबुकने दिलं.
माहिती लीक झालेल्या एका कर्मचाऱ्याने घाबरुन नोकरीलाच रामराम केला आहे. ज्या संशयित दहशतवाद्याला फेसबुकवरुन बॅन केलं, तो आपला शोध घेईल, अशी भीती या कर्मचाऱ्याला आहे.
"जेव्हा तुम्ही युद्धजन्य क्षेत्रात असाल आणि संबंधित दहशतवाद्यांना किंवा त्यांच्या संघटनांना तुमची, तुमच्या कुटुंबाची माहिती मिळाली असेल, तर ते गप्प बसतील का" अशी चिंत या कर्मचाऱ्याने व्यक्त केली.
दरम्यान, फेसबुकने संबंधित कर्मचाऱ्यांना अतिरिक्त सुरक्षा प्रदान केली आहे.