मुंबई : तुम्ही व्हॉट्सअॅप वापरत असाल आणि तुम्हाला कोणी अनोळखी व्यक्ती तुमचा व्हॉट्सअॅप व्हेरिफिकेशन कोड मागत असेल, तर जरा सावधान. कारण, या व्हेरिफिकेशन कोडमुळे तुमचं व्हॉट्सअॅप अकाऊंट हॅक होऊ शकतं.
आम्ही गरिबांना मदत करतोय, आम्ही स्वयंसेवी संस्थेतून बोलतोय किंवा आम्ही इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीतून बोलतोय, अशा प्रकारचे फोन कॉल तुम्हाला येत असतील तर त्यापासून सावध राहा. कारण अशा प्रकारच्या फोन कॉलद्वारे व्हॉट्सअॅप हॅक करून पैसा उकळणारी टोळी मुंबईत सक्रिय झाली आहे.
'व्हॉट्सअॅप स्पूफिंग'द्वारे पहिल्यांदा तर हॅकर्स सोशल इंजिनिरिंग करून व्हॉट्सअॅप व्हेरिफिकेशन कोड आपल्याकडून काढून घेतात. त्यानंतर एका दुसऱ्या मोबाइलमध्ये हा व्हेरिफिकेशन कोड वापरून दुसऱ्या व्यक्तीच्या नंबरचं व्हॉट्सअॅप सुरु केलं जातं. या नव्याने सुरु केलेल्या व्हॉट्सअॅपद्वारे आपले सर्व कॉन्टॅक्ट्स, फोटो, व्हिडिओही हॅकर्सला मिळू शकतात.
तुमचं अकाऊंट हॅक झाल्यास काय कराल?
गेल्या काही दिवसात व्हॉट्सअॅप हॅकिंगच्या प्रकरणात मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. व्हॉट्सअॅप हॅकिंग करणं फारसं अवघड नाही. तुमचं व्हॉट्सअॅप हॅक झाल्यास तुम्ही व्हॉट्सअॅप अकाऊंट लवकर डिलीट करून नव्याने व्हॉट्सअॅप इंस्टॉल करा. जेणेकरून, तुमचं अकाऊंट हॅक केलं तरी ते आपोआप बंद होईल.