टोकियो : जपानमध्ये सामान्य मुलीसारख्या दिसणाऱ्या डिजीटल मुलीची निर्मिती करण्यात आली आहे. टोकियोतील एका कॉम्प्यूटर लॅबमध्ये 'साया' नावाच्या डिजीटल मुलीला तयार केलं आहे. व्यवसायाने ग्राफिक आर्टिस्ट असलेल्या यूको इशिकावा आणि त्यांच्या पतीने डिजीटल मुलीची निर्मिती केली आहे.
या डिजीटल मुलीचा फोटो त्यांनी वेबसाईटवर शेअर केला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ही डिजीटल मुलगी हुबेहूब सामान्य मुलीसारखीच दिसते. मागच्या वर्षी सायाची निर्मिती करण्यात आली होती. पण गेल्या वर्षभरात तिच्यावर अनेक प्रयोग करुन सुधारणाही करण्यात आल्या आहेत. तिच्या अद्ययावत आवृत्तीमध्ये चेहऱ्यावर हावभाव देण्याचा प्रयत्न या दाम्पत्याने केला आहे. सायाला खऱ्याखुऱ्या मानवी चेहऱ्यासारखं बनवण्यासाठी तिच्या डोक्यापासून पायापर्यंत फार सूक्ष्म पद्धतीने काम करण्यात आलं आहे.
"आम्ही स्वत:ला सायाचे पालक नसलो तरीही तिला मुलीप्रमाणेच प्रेम करतो. तिला बनवताना टोकियोतील शिबुआ प्रांतातील मुलींना डोळ्यासमोर ठेवण्यात आलं आहे. तसंच ती 17 वर्षांची दिसावी यासाठीही प्रयत्न केला आहे" अशी माहिती यूको इशिकावा यांनी दिली. सायाची निर्मिती एका शॉर्टफिल्मसाठी करण्यात आली होती. पण तिला पाहून यूको आणि त्यांच्या पतीने नोकरी सोडून सायावर काम करण्याचं ठरवलं आहे.
फोटो सौजन्य http://www.telyuka.com/