आता चष्म्यातूनही व्हिडिओ रेकॉर्डिंग शक्य
एबीपी माझा वेब टीम | 03 Oct 2016 11:30 AM (IST)
मुंबई: स्नॅपचॅट मेसेजिंग अॅपने आपला पहिला गॅजेट कॅमेरा चष्मा नुकताच लॉन्च केला आहे. कंपनीने या चष्म्याचे नामकरण 'स्पॅक्टेकल्स' असे केले असून, या चष्म्यामधून 30 सेकंदाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे शक्य आहे. या चष्म्याची किंमत भारतीय चलनानुसार 8710 रुपये निश्चित करण्यात आली आहे. हा चष्मा या वर्षीच्या अखेरीस बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. कंपनीने या चष्म्याच्या लॉन्चिंगवेळी स्नॅपचॅट मेसेजिंग अॅपचे नाव बदलुन स्नॅपइंक केल्याची घोषणा केली. गूगलनेही काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारचे ग्लास तयार करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी चष्म्यातून व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याची संकल्पना मांडली. पण याला वास्तवात आणण्यात गूगलला अपयश आले होतं. मात्र, हेच तंत्रज्ञान विकसीत करण्यात स्नॅप चॅटने बाजी मारली आहे. विशेष म्हणजे, हे तंत्रज्ञान 26 वर्षीय इवान श्लीगल याने विकसीत केले असून त्याने वॉल स्ट्रिट जर्नलला दिलेल्या मुलाखतीत या चष्म्याबद्दलची माहिती दिली. तो म्हणाला की, ''आमच्या सुट्टयांवेळी आम्ही कॅलिफोर्नियाला गेलो होतो. येथील जंगल सफरीचा अनुभव घेतला. या सफरीचे व्हिडिओ पाहिल्यानंतर आम्हालाही निसर्गसौंदर्य पाहून विश्वास बसला नाही. आता हा असेच अनुभव लोकांनाही घेणे शक्य आहे.''