नवी दिल्ली :  भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित चुकीची माहिती पसरवल्याबद्दल 22 YouTube चॅनेल, तीन ट्विटर खाती आणि एक फेसबुक खातं ब्लॉक (Govt Blocks 18 Indian Youtube channels)  करण्यात आली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.  22 चॅनेलपैकी 18 यूट्यूब न्यूज चॅनेल ही भारतीय आहेत आणि चार पाकिस्तान-आधारित यूट्यूब न्यूज चॅनेल आहेत.


माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने, आयटी नियम, 2021 अंतर्गत आणीबाणीच्या अधिकारांचा वापर करून, 4 एप्रिलला युट्यूब आधारित न्यूज चॅनेल, तीन ट्विटर खाती, एक फेसबूक खातं आणि एक न्यूज वेबसाइट  ब्लॉक करण्याचे आदेश जारी केले. ए आर पी न्यूज, एओपी न्यूज, एलडीसी न्यूज, सरकारी बाबू, एस एस झोन हिंदी, स्मार्ट न्यूज, न्यूज23 हिंदी, ऑनलाइन खबर, डीपी न्यूज, पीकेबी न्यूज, किसानटक, बोराणा न्यूज, सरकारी न्यूज अपडेट, भारत मौसम, आरजे झोन 6, परीक्षा अहवाल, डिजी गुरुकुल आणि दिनभर की खबरे ही भारतीय चॅनेल्स ब्लॉक करण्यात आली आहेत. DuniyaMeryAagy, Gulam NabiMadni, HAQEEQAT TV आणि HAQEEQAT TV 2.0 ही चार पाकिस्तानी YouTube न्यूज चॅनेल आहेत. DuniyaMeryAagy चे वेबसाइट, ट्विटर अकाउंट आणि फेसबुक अकाउंट देखील ब्लॉक करण्यात आले आहे, तर गुलाम नबीमदनी आणि हकीकत टीव्हीचे ट्विटर अकाउंट ब्लॉक करण्यात आले आहेत.


अवरोधित चॅनेलची एकत्रित दर्शक संख्या 260 कोटी आहे. जम्मू आणि काश्मीर, युक्रेन आणि भारतीय लष्कर यांसारख्या संवेदनशील विषयांवर चॅनेलने खोट्या बातम्या पसरवल्या आणि सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवली असं मंत्रालयाने प्रसिद्धपत्रकात म्हटलं आहे. भारतीय सशस्त्र सेना, जम्मू आणि काश्मीर इत्यादी विविध विषयांवरील बनावट बातम्या पोस्ट करण्यासाठी अनेक युट्यूब चॅनेल्स वापरण्यात आले होते. ब्लॉक करण्याचा आदेश देण्यात आलेल्या सामग्रीमध्ये पाकिस्तानकडून समन्वित पद्धतीने चालवल्या जाणार्‍या एकाधिक सोशल मीडिया खात्यांवरून पोस्ट केलेल्या काही भारतविरोधी सामग्रीचाही समावेश आहे. 






भारतीय यूट्यूब आधारित चॅनेलद्वारे युक्रेनमधील सध्याच्या परिस्थितीशी संबंधित आणि इतर देशांसोबतचे भारताचे परराष्ट्र संबंध धोक्यात आणण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात खोट्या सामग्री प्रकाशित केल्याचं मंत्रालयाने नमूद केले.


या चॅनेल्सनी दर्शकांची दिशाभूल करण्यासाठी काही टीव्ही न्यूज चॅनेलचे टेम्प्लेट आणि लोगो, त्यांच्या न्यूज अँकरच्या प्रतिमांचा वापर केल्याचं सरकारने म्हटलं आहे. खोट्या  thumbnail चा वापर करण्यात आला. तसेच व्हिडिओ व्हायरल झाल्याचे सुनिश्चित करण्यासाठी शीर्षक आणि thumbnail  वारंवार बदलले गेले. पाकिस्तानी वाहिन्यांवर पद्धतशीरपणे भारतविरोधी फेक न्यूजही होत्या असंही सरकारने सांगितलं. या ब्लॉकिंगसह, मंत्रालयाने डिसेंबर 2021 पासून, राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित कारणास्तव 78 YouTube न्यूज चॅनेल आणि अनेक सोशल मीडिया खाती ब्लॉक केली आहेत.


"भारत सरकार प्रामाणिक, विश्वासार्ह आणि सुरक्षित ऑनलाइन वृत्त माध्यम वातावरण सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे आणि भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता, राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्था यांना हानी पोहोचवण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना हाणून पाडण्यासाठी वचनबद्ध आहे," असे सरकारने म्हटले आहे.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha