कंपनीच्या विस्तारासाठी बीएसएनएल 6000 कोटी खर्च करणार!
एबीपी माझा वेब टीम | 09 Sep 2017 10:24 AM (IST)
बीएसएनएलने गेल्या तीन वर्षात 40 हजार बीटीएस उभे केले आहेत. आता पुढच्या टप्प्यात 40 हजार बीटीएस उभे करुन नेटवर्कचा विस्तार केला जाणार आहे.
नवी दिल्ली : सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएल नेटवर्कच्या विस्तारासाठी येत्या दोन वर्षात 40 हजार बेस ट्रान्झिव्हर स्टेशन (बीटीएस) उभे करण्यासाठी 6 हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. यामुळे बीएसएनएल नेटवर्कचा विस्तार होण्यासाठी मदत होईल. उपकरणं तयार करणाऱ्या कंपन्यांना टेंडर देण्याची प्रक्रिया बीएसएनएलने सुरु केली आहे. या विस्तार योजनेत नोकिया आणि झेडटीई या सर्वात जास्त बोली लावणाऱ्या कंपन्या ठरल्या आहेत, अशी माहिती बीएसएनएलच्या एका अधिकाऱ्याने दिली. बीएसएनएलने गेल्या तीन वर्षात 40 हजार बीटीएस उभे केले आहेत आणि आता पुढच्या टप्प्यातला विस्तार सुरु आहे. येत्या दोन वर्षात 40 हजार बीटीएस उभे केले जातील. यासाठी 6 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आल्याची माहिती बीएसएनएलचे अध्यक्ष आणि प्रकल्प संचालक अनुपम श्रीवास्तव यांनी दिली. नव्या बीटीएसमुळे 2G, 3G आणि 4G या तिन्हीही सेवा दिल्या जातील. शिवाय ग्राहक 2G नेटवर्क अपग्रेडही करु शकतील. बीएसएनएलचे सध्या 1 लाख 30 हजार बीटीएस आहेत. विस्तार योजनेनंतर याची संख्या 1 लाख 70 हजार होईल.