अँड्रॉईडनंतर 'भीम अॅप' आता आयफोनधारकांसाठीही उपलब्ध
एबीपी माझा वेब टीम | 11 Feb 2017 03:43 PM (IST)
मुंबई : अँड्रॉईडधारकांनंतर 'भीम अॅप' आता आयफोन यूझर्सच्याही भेटीला येत आहे. आयओएस प्लॅटफॉर्मवर भीम अॅप लाँच करण्यात आलं आहे. डिजीटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी भीम अॅप तयार करण्यात आलं आहे. आतापर्यंत 1.4 कोटींपेक्षा जास्त यूझर्सनही भीम अॅप डाऊनलोड केलं आहे. 'भारत इंटरफेस फॉर मोबाईल' अर्थात 'भीम' हे ऑनलाईन पेमेंट अॅप भारतातलं सर्वात प्रसिद्ध अँड्रॉईड अॅप ठरलं आहे. डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'डिजिधन मेला'मध्ये भीम हे आधार संलग्न मोबाईल पेमेंट अॅप लाँच केलं होतं. लाँचिंगच्या तीनच दिवसात भारतात गुगल प्ले स्टोअरवर हे अॅप अव्वल ठरलं होतं. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने हे अॅप तयार केलं आहे. आयओएसधारकांना अँड्रॉईडप्रमाणेच प्रत्येक व्यवहारामागे दहा हजार रुपयांची मर्यादा आहे, तर प्रत्येक दिवसाला 20 हजार रुपयांपर्यंत व्यवहार करता येतील. सध्या फक्त हिंदी आणि इंग्रजी हे दोनच पर्याय उपलब्ध आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना हे अॅप समर्पित असल्याचंही मोदींनी सांगितलं. त्यांच्या भीमराव नावापासूनच या अॅपचं नामकरण केलं असल्याची माहिती मोदींनी दिली. या अॅपमुळे गरिबांना व्यवहार सोपे होणार आहेत. केवळ अंगठा लावून पेमेंट करता येईल. एवढंच नाही, तर हे अॅप गरिबांच्या घरातील आर्थिक महासत्ता असेल, असंही मोदींनी सांगितलं.