Snooping By Mobile Applications : तुमच्याकडे स्मार्ट फोन आहे? तुम्ही फोनमध्ये खूप सारे अॅप्स डाऊनलोड केलेत? जर या प्रश्नांचं उत्तर हो असेल तर सावधान. कारण काही मोबाईल अॅप्समुळे तुमच्या प्रायव्हसीला धोका निर्माण झालाय. त्याचा वापर तुमच्यावर पाळत ठेवण्यासाठी होतोय.


स्मार्ट फोन्स आणि त्यातले अॅप्स...या सगळ्यांची आपल्याला इतकी सवय लागलीय की, झोपेचे काही तास सोडले तर सर्वाधिक वेळ आपण फोनवरच घालवतो. फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटरसारखे शेकडो अॅप्स आपल्या प्ले स्टोअरवर आहेत. याच अॅप्सद्वारे आपण एका क्लिकवर जगातल्या कोणत्याही टोकावर असलेल्या व्यक्तीशी जोडले जावू शकतो. कोणताही प्रश्न असू द्या, त्याचं उत्तर फोनवर अगदी एका क्लिवर मिळतं. 


म्हणजेच काय तर तुमच्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट तुमच्या फोनला माहिती आहे. तीच माहिती दुसऱ्या कुणाला तरी पुरवली जातेय आणि तीही तुमच्या परवानगीनं. कोणतही अॅप डाऊनलोड करत असताना TERMS AND CONDITIONS कोणीच पूर्णपणे वाचत नाही.. कारण, या सुपरफास्ट जगात ते वाचण्याचा वेळ कुणाकडेच नाही. म्हणून प्रत्येक जण TERMS AND CONDITIONS न वाचताच अॅप्लिकेशन्स डाऊनलोड करतो आणि न कळत अॅप्सला सगळ्या परवानग्या देतो.


आता एक उदाहरण पाहू. फेसबूक अकाऊंट लॉग इन केल्यानंतर बहुतेकवेळा तुमच्या टाईमलाईनवर तुमच्या आवडीच्या विषयांचेच व्हिडिओ दिसतात. मग, हे असं का होतं तर त्याचं उत्तर आहे फेसबुक प्रोफाईल. जरा सोप्या शब्दात ऐका. एक प्रोफाईल तुम्ही तयार करता. आणि दुसऱ्या बाजूला फेसबुककडूनही तुमची एक प्रोफाईल केली जाते.
जिथं तुमच्या आवडी-निवडीच्या विषयांची यादी तयार केली जाते. फक्त फेसबूक नाही तर गुगलवरही अशा प्रकारे प्रोफाईलिंग केलं जातं. आपल्या याच माहितीचा वापर जाहिरात क्षेत्रासाठी केला जातो.


आपली माहिती अशा प्रकारे मोठ्या कंपन्यांना विकली जाते आणि त्यामुळेच आपल्याला आवडणाऱ्या गोष्टींच्याच जाहिराती आपल्याला दिसत असतात. बरं, तुम्ही म्हणाल की यात आपलाच फायदा आहे. यामुळे कोणत्याही गोष्टीच्या शोधासाठी लागणारा वेळ कमी होईल. मात्र, तुमच्या थोड्याशा फायद्यासाठी तुमची माहिती गोळा केली जातीय. 


फेसबुक, गुगलसारख्या कंपन्या तर थेट तुम्हाला सांगून तुमच्यावर पाळत ठेवतात. मात्र, असे अनेक अॅप्लिकेशन्स असे आहेत जे छुप्या पद्धतीनं तुमच्यावर पाळत ठेवतात. ज्याचा फायदा काही कंपन्या घेवू शकतात. 


काही आकर्षक अॅप्सद्वारे तुमची हेरगिरी शक्य आहे. काही अॅप्सद्वारे मायक्रोफोन हॅक करुन ऑडिओ रेकॉर्डिंग शक्य आहे. तुमच्या फोनमध्ये असलेल्या डेटावरही पाळत शक्य आहे. तुमच्या परवानगीशिवाय फोनमधील कॅमेऱ्याचाही वापर शक्य आहे. फोनमधील बँक खात्याची माहिती पळवणं शक्य आहे. 


बदलत्या जगासोबत बदलण्यासाठी स्मार्ट फोन अनिवार्य झाला आहे. त्याचसबोत अनेक स्मार्ट गोष्टी तुमच्या आजूबाजूला आल्यात. हाच वापर आणखी सोपा आणि सुपरफास्ट करण्यासाठी अनेक कंपन्यांनी शेकडो अॅप्लिकेशन्स बाजारात आणलेत. मात्र, थोड्या फायद्यासाठी एखादं अॅप्लिकेशन डोऊनलोड करत असाल तर थोडा वेळ घ्या. कारण, थोडा फायदा खूप मोठं नुकसान करुन जावू शकतो. 


महत्वाच्या बातम्या :