मुंबई : अतिशय लोकप्रिय असणाऱ्या इन्स्टाग्राम या सोशल नेटव्हर्किंगसाईटवर हल्लीकडे युजर्सना त्यांनीच केलेल्या पोस्ट या कॉपीराईट नियमांचं उल्लंघन करणाऱ्या असल्याचं सांगत त्यांची दिशाभूल करण्याचं धक्कादायक सत्र सुरु आहे. मागील काही दिवसांपासून अशा फसवेगिरीच्या घटनांमध्ये वाढही झाल्याचं वृत्त आहे.
सायबर पोलिसांच्या माहितीनुसार अमुक एका युजरचं अकाऊंट हॅक करण्यासाठी हॅकर सर्वप्रथम एखाद्या अतिशय लोकप्रिय अकाऊंटचा शोध घेतो. त्यानंतर सदर युजरनं इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्ट क़ॉपीराईट नियमांचं उल्लंघन करणाऱ्या असल्याचं म्हणत याकडे युजरचं लक्ष वेधत भीती निर्माण करतो. इतकंच नव्हे, तर COPYRIGHT INFRINGEMENT अंतर्गत या युजरवर रितसर कारवाईही केली जाणार असल्याचं सांगत पुढील 24 तांसांत अकाऊंट सस्पेंड केलं जाऊ शकतं अशी धमकीवजा माहिती देतो.
अशा वेळी ज्यांचे हजारो आणि लाखोंच्या घरात फॉलोअर्स आहेत अशी काही मंडळी या फसव्या धमक्यांवर विश्वास ठेवतात आणि हॅकर सांगेल तसं करुही लागतात. त्यानंतर हा हॅकर डीएम अर्थात डिरेक्ट मेसेजच्या माध्यमातून युजरला त्यांची बाजू मांडण्यासाठी एक लिंक पाठवतो. या लिंकवरील कॉपीराईट ऑब्जेक्शन फॉर्म भरावा असं तो युजरला सांगतो. हे सारंकाही फसवणुकीच्या उद्देशानं सांगण्यात येत असतं.
महाराष्ट्र सायबर पोलिसांच्या माहितीनुसार ऑब्जेक्शन फॉर्मसाठी त्या लिंकवर क्लिक करताच युजर एका वेगळ्या वेबसाईवर पोहोचतो जी हुबेहुब इन्स्टाग्रामसारखी दिसत असते. इथं माहितीच्या गोपनीयतेची शाश्वती नसते.
सायबर पोलिसांच्या माहितीनुसार या अशा वेबसाईटचं URL (.com) स्वरुपात नव्हे तर, (.CF) स्वरुपात दिसतं. इन्स्टाग्रामची मूळ वेबसाईट आणि ही फसवी वेहसाईट यांमध्ये इतकं साधर्म्य आहे कीह प्रथमत: एखाद्याचा गोंधळच उडेल. या पेजवर तुम्हाला तुमची माहिती, जन्मतारिख, युजर नेम अशी माहिती विचारली जाते. ज्यानंतर तुम्हाला इथं लॉगईन करण्यासही सांगण्यात येतं. जुयरनं या पेजवर लॉगईन केल्याच त्याची संपूर्ण माहिती या हॅकरपर्यंत पोहोचते. सध्या सोशल मीडियावर अशाच काही हॅकर्सचा सुळसुळाट असल्यामुळं सायबर पोलिसांकडून नेटकऱ्यांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.