मुंबई : ऑडी सध्या आपल्या फ्लॅगशिप एसयूव्ही ‘क्यू 7’च्या पेट्रोल व्हर्जनवर काम करत आहे. भारतात 1 सप्टेंबर रोजी ऑडीची ही नवी एसयूव्ही कार लॉन्च केली जाणार असल्याची माहिती मिळते आहे. ऑडीची पेट्रोल व्हर्जन ‘क्यू 7 40 टीएसआय’ नावाने येणार आहे.
‘क्यू 7’ मॉडेल सध्या ’45 टीडीआय प्रीमियम प्लस’ आणि ’45 टीडीआय क्वाट्रो टेक्नोलॉजी’ या दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. मात्र या दोन्ही व्हेरिएंटमध्ये सध्या फक्त डिझेल इंजिन देण्यात आले आहे.
पेट्रोल व्हेरिएंटमध्ये 2.0 लीटरचं टीएफएसआय इंजिन देण्यात येईल, जे 255 पीएस पॉवर आणि 370 एनएम टॉर्क देईल. शिवाय इंजिन-8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेला असेल. मायलेज देण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, असा कंपनीचा दावा आहे.
ऑडीच्या या नव्या ‘क्यू7’च्या पेट्रोल व्हेरिएंटच्या किंमतीबाबत अद्याप कोणतीही माहिती कंपनीकडून देण्यात आलेली नाही. मात्र, 75 लाख ते 80 लाख रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. मर्सिडिज-बेंज जीएलएस आणि बीएमडब्ल्यू एक्स-5 या कारशी ऑडीच्या नव्या एसयूव्ही पेट्रोल व्हर्जनची स्पर्धा असेल.
(या कारबाबत माहिती आणि फोटो cardekho.com वरुन घेण्यात आली आहे.)