मुंबई : मोबाईल तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी अॅपलला गेल्या 13 वर्षात पहिल्यांदाच झटका बसला आहे. अॅपलने मंगळवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार कंपनीला 13 वर्षात पहिल्यांदाच तोटा झाला आहे.
पहिल्या तिमाहीत कंपनीच्या कमाईत 13 टक्के घसरणीची नोंद झाली आहे. आयफोनच्या विक्रीत घट झाल्यामुळेच कंपनीवर ही वेळ आली आहे.
दुसरीकडे अॅपलचं चीनमधील स्थान आणि विक्री याबाबत कंपनीला अतिविश्वास होता. त्याचाही परिणाम झाल्याचं सांगण्यात येत आहे.
आकडेवारीनुसार गेल्यावर्षी याच तिमाहीत अॅपलने 58 अब्ज डॉलरची विक्री केली होती. यावर्षी यामध्ये घट होऊन 50 अब्ज डॉलर इतकी विक्री झाली आहे. अॅपलच्या विक्रीमध्ये 2003 नंतर पहिल्यांदाच घट नोंद झाली आहे.
5 कोटी 12 लाख आयफोनची विक्री
या तिमाहीत अॅपलने 5 कोटी 12 लाख आयफोनची विक्री केली आहे. मात्र गेल्या वर्षी याच तिमाहीत विक्रीचा आकडा 6 कोटी 12 लाखांचा होता.
सध्या चीनमध्ये आयफोनच्या विक्रीत 26 टक्के घट झाली आहे. डॉलर वधारल्याचा परिणामही आयफोनच्या विक्रीवर झाला आहे.
दुसरीकडे याचा परिणाम शेअर बाजारावरही झाला आहे. अॅपलचे शेअर गेल्या वर्षभरात 20 टक्क्यांनी कोसळले आहेत.
दरम्यान मोठ्या अर्थव्यवस्था संकटात असूनही कंपनी चांगला बिझनेस करत आहे, असा आशावाद अॅपलचे सीईओ टिम कूक यांनी व्यक्त केला आहे.