बंगळुरु : आयफोन या उच्चभ्रू स्मार्टफोनची निर्मिती भारतात व्हावी, यासाठी अॅपल उत्सुक आहे. त्यासाठी बऱ्याच कालावधींपासून प्रयत्न सुरु आहेत. मधल्या काळात अॅपलसाठी आयफोनची निर्मिती करणारी फॉक्सकॉन ही चीनी कंपनी भारतात दाखल झाल्याचीही चर्चा होती. पण आता फॉक्सकॉनला मागे टाकून तैवानच्या विस्ट्रॉन या कंपनीने अॅपलच्या आयफोन प्रॉडक्शन युनिटसाठी कर्नाटकात बंगळुरुमध्ये जागा निश्चित केल्याची बातमी आहे.


एवढंच नाही तर येत्या काही महिन्यात म्हणजे एप्रिलपासून भारतात विस्ट्रॉनमार्फत आयफोनची निर्मितीही शक्य होणार आहे.

फॉ़क्सकॉन या कंपनीद्वारे आयफोनची भारतात निर्मिती करण्याची बातमी तशी बरीच जुनी आहे. फॉक्सकॉनने महाराष्ट्रात प्रॉडक्शन युनिट सुरु करावं यासाठी राज्य सरकारने बरेच प्रयत्न केले. अजूनही फॉक्सकॉनचा निर्णय झालेला नाही. ते कधी तेलंगणा तर कधी महाराष्ट्र असं तळ्यात-मळ्यात करत असतात.

नवी मुंबईत फॉक्सकॉनचे 4G स्मार्टफोन, मार्चपासून निर्मिती सुरू!


 

बंगळुरुजवळच्या पिनया परिसरात विस्ट्रॉन अॅपलसाठी फोननिर्मिती युनिट कार्यान्वित करणार आहे.

अॅपलसाठीच आयफोनची निर्मिती करणारी फॉक्सकॉनही चीनची सर्वात मोठी कंपनी आहे. विस्ट्रॉनच्या खूप आधीपासून फॉक्सकॉन भारतात येणार असल्याची चर्चा आहे. फॉक्सकॉनच्या अनेक अधिकाऱ्यांचे दौरे भारतात झाले आहेत. त्यांनी तेलंगणा आणि महाराष्ट्रात अनेक जागांची पाहणीही केली. मात्र फॉक्सकॉन फक्त आयफोनच नाही तर शाओमी आणि वन प्लस या चीनी मोबाईल कंपन्यांच्या हँडसेटची निर्मिती करणार असल्याचं सांगितलं जातं.

आयफोन आता 'मेक इन महाराष्ट्र', फॉक्सकॉनचा राज्य सरकारशी करार


 

भारत सरकार मेक इन इंडिया मोहीमेअतर्गंत अनेक विदेशी कंपन्याना भारतात प्रॉडक्शन युनिट सुरु करण्यासाठी आमंत्रित करत आहेत. त्यासाठी अनेक सोयीसुविधा देण्याचीही घोषणा होत आहेत. त्याचाच फायदा मोबाईल उद्योगातल्या बड्या ब्रँडना सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना होणार आहे.

अॅपलच्या आयफोनची निर्मिती भारतात झाली तर सर्वात महागड्या आणि उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या या स्मार्टफोनच्या किंमतीत बरीच कपात अपेक्षित आहे. सध्या भारतात विक्री केले जाणारे अॅपलचे सर्व स्मार्टफोन हे आयात होत असल्यामुळे त्यावर किमान 12.5 टक्के आयातकर द्यावा लागतो. भारतातच निर्मिती झाली तर हा साडेबारा टक्क्यांचा भुर्दंड नक्कीच वाचणार आहे, त्याचा फायदा पर्यायाने भारतीय ग्राहकांनाच होईल.

मेक इन महाराष्ट्र! आयफोनची निर्मिती महाराष्ट्रात होणार, किमतीही उतरणार