नवी दिल्ली : स्नॅपडीलनंतर आता अमेझॉननेही नव्या वर्षातल्या पहिल्या सेलची जंगी तयारी सुरु केली आहे. या सेलसाठी ‘अमेझॉन इंडिया’ने भारतात तब्बल 7 हजार 500 जणांची हंगामी नोकरीसाठी भरती केली आहे.


अमेझॉनचा ‘ग्रेट इंडियन सेल’ 20 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून 22 जानेवारीला रात्री 11.59 वाजेपर्यंत सुरु असेल.

अमेझॉनच्या देशभरातील 27 सेंटर, 100 हून अधिक डिलिव्हरी स्टेशन आणि 15 सॉर्ट सेंटर्सवर या भरती केलेल्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

“नव्या दमाच्या कर्मचाऱ्यांसोबत काम करण्यास आम्ही उत्सुक आहोत. ग्रेट इंडियन सेलमुळे देशात 7,500 जणांना हंगामी काम मिळणार असून, पुढेही अमेझॉनसोबत काम करण्याची संधीही असेल, अशी माहिती अमेझॉन इंडियातील इंडिया कस्टमर फुलफिलमेंटचे मुख्य अखिलेश सक्सेना यांनी दिली.

लॉजिस्टिक आणि डिलिव्हरी या विभागांवर अमेझॉनने अधिक भर देण्याचे ठरवले आहे. जेणेकरुन अमेझॉनवरुन कोणतंही प्रॉडक्ट ग्राहकांपर्यंत अधिकाधिक लवकर पोहोचवता येईल.

अमेरिकास्थित ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट अमेझॉनने भारतात 5 अब्ज अमेरिकन डॉलरची गुंतवणूक करणार आहे.