लखनऊ : उत्तर प्रदेशमधील अखिलेश सरकारची 'समाजवादी स्मार्टफोन' योजना लॉन्च होण्याआधीच ट्विटरवर ट्रेण्ड झाली आहे. गेल्या काही तासांपासून ट्विटरवर अखिलेश सरकारची ही अनोखी योजना ट्विटरवर ऑल इंडिया पहिल्या नंबरवर ट्रेण्ड होते आहे. आतापर्यंत सोळा लाखांहून अधिक जणांनी समजावादी स्मार्टफोन योजनेच्या पोर्टलला भेट दिली आहे.


समाजवादी स्मार्टफोनची नोंदणीही सुरु झाली आहे. आतापर्यंत जवळपास 11 हजार लोकांनी या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी नोंदणी केल्याची माहिती मिळते आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आज दुपारीच आपल्या ऑफिसमध्ये समाजवादी स्मार्टफोन योजनेचा शुभारंभ केला.

मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी samajwadisp.in ही वेबसाईट लॉन्च करुन, योजनेच्या लाभासाठी नोंदणीही सुरु केली. पुढील महिन्याच्या म्हणजेच नोव्हेंबरच्या 8 तारखेपर्यंत उत्तर प्रदेशातील नागरिक आपली नोंदणी करु शकतात.

समाजवादी स्मार्टफोन योजनेचा लाभ अशा नागरिकांनाच मिळणार आहे, ज्यांचं वय 1 जानेवारी 2017 पर्यंत 18 वर्षे पूर्ण असेल. शिवाय, सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. वर्षभराची कमाई 6 लाखांहून अधिक असेल, तरीही स्मार्टफोन योजनेचा लाभ मिळणार नसल्याची माहिती उत्तर प्रदेश सरकारकडून देण्यात आली आहे.

या योजनेसाठी वर्षाकाठी अखिलेश सरकारचे 4 हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. मात्र, याआधी ज्या प्रकारे लॅपटॉप वाटपाची योजना अखिलेश सरकारने राबवली होती. त्याचप्रकारे स्मार्टफोनची योजना राबवली जाणार आहे. शिवाय, सोशल मीडियावर जरी उलट-सुलट चर्चा या योजनेबद्दल मोठ्या प्रमाणावर चर्चा मात्र सुरु झाली आहे.