नवी दिल्ली : एअरटेल, आयडिया आणि व्होडाफोनने इंटरकनेक्शन यूझर्स चार्ज (आययूसी) वाढवण्याची मागणी केली आहे. यामुळे फोनवर बोलणं महागण्याची शक्यता आहे. इंतर कंपन्यांचे कॉल जोडण्यासाठी 30 ते 35 पैसे प्रती मिनिट खर्च येतो, असं या कंपन्यांचं म्हणणं आहे.


आययूसीमध्ये कोणताही बदल केल्यास त्याचा थेट परिणाम कॉल दरांवर होऊ शकतो. कारण कॉल दर ठरवताना या गोष्टीवर सर्वात जास्त लक्ष दिलं जातं. तर दुसरीकडे इनकमिंग कॉल्सवर कोणताही चार्ज लागू नये, असं रिलायन्स जिओचं मत आहे.

दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात 'ट्राय'सोबत कंपन्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये काही कंपन्यांनी आययूसीमध्ये वाढ करण्याची मागणी केली. तर काहींनी आहेत, तेच दर ठरवण्याचं मत व्यक्त केलं, अशी माहिती बैठकीनंतर 'ट्राय'चे अध्यक्ष आर. एस. शर्मा यांनी दिली.

आययूसी ट्रायकडून निश्चित केला जातो. सध्या प्रत्येक इनकमिंग कॉलवर 14 पैसे आययूसी आकारला जातो. तो 14 पैशांवरुन 30 ते 35 पैसे प्रति मिनिटांनी वाढवण्याची मागणी कंपन्यांनी केली आहे. शर्मा यांनी कोणत्याही कंपनीचं नाव घेतलं नाही. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयडिया, व्होडाफोन आणि एअरटेलने आययूसी 30 ते 35 पैशांनी वाढवण्याची मागणी केली आहे.