एअरटेल आपल्या ब्रॉडबॅण्डच्या ग्राहकांना देणार 5GB फ्री डेटा
एबीपी माझा वेब टीम | 10 Aug 2016 03:38 PM (IST)
नवी दिल्ली: जर तुम्ही एअरटेलचे ब्रॉडबॅण्ड वापरत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कंपनीने आपल्या ब्रॉडबॅण्ड वापरणाऱ्या ग्राहकांना प्रति महिना 5GB चा डेटा मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, एअरटेल पोस्टपेड किंवा एअरटेल डिजिटल टीव्ही कनेक्शनचा वापर करणाऱ्या ग्राहकांनाही याचा लाभ घेता येणार आहे. एअरटेलकडून ही ऑफर 'माय होम रिवॉर्ड' अंतर्गत देण्यात येत आहे. जर तुमच्याकडे एअरटेलचे दोन पोस्टपेड कनेक्शन असतील, आणि एक कनेक्शन एअरटेल डिजिटल टीव्ही कनेक्शनचे असेल, तर तुम्हाला या तिन्ही कनेक्शनसाठी 5GB प्रत्येकी असा एकूण 15GB चा मोफत डेटा वापरण्यास मिळणार आहे. हा डेटा तुमच्या मासिक यूजेस डेटा प्लॅनपेक्षा अधिक असेल. कंपनीचे होम डिव्हीजनचे सीईओ हेमंथ कुमार गुरुस्वामींनी ई-मेलद्वारे एक स्टेटमेंट पाठवून ही माहिती दिली. ते म्हणाले की, ''आपल्या लॅण्डलाइनवर अमर्यादित कॉलिंगची सुविधा देण्याबरोबरच, कंपनी आता आपल्या ग्राहकांना मोफतचा अतिरिक्त डेटा देणार आहे.'' या सुविधेचा लाभ घेण्यासाठी, एअरटेल ग्राहकांना 'माय एअरटेल अॅप'च्या माध्यमातून किंवा एअरटेलच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी लागणार आहे. ही ऑफर एअरटेलच्या नव्या आणि जुन्या दोन्ही ग्राहकांसाठी देण्यात आली आहे.