मुंबई : जिओमुळे दुरावलेल्या स्मार्टफोन युजर्सना पुन्हा आपल्याकडे आणण्यासाठी सर्वच टेलिकॉम कंपन्या दर महिन्याकाठी वेगवेगळ्या आकर्षक ऑफर्स, प्लान, पॅक यांची घोषणा करत असतात. या स्पर्धेत आता एअरटेल या प्रसिद्ध टेलिकॉम कंपनीने सुद्धा उडी घेतली आहे. 499 रुपयांच्या रिचार्जमध्ये रोज 2GB इंटरनेट डेटा वापरायला मिळणार आहे. हा रिचार्ज पॅक 82 दिवसांसाठी असेल. म्हणजे एकदा रिचार्ज केल्यानंतर पुढील 82 दिवस तुम्हाला या ऑफरचा लाभ घेता येईल.


भारतात सध्या आयपीएल सुरु आहे. जवळपास दोन महिने भारतात आयपीएलची धामधूम असेल. ज्यांच्या घरी टीव्ही नाही किंवा टीव्ही असून ज्यांचा कायम प्रवासात वेळ जातो, असे लोक हॉटस्टारवर आयपीएल पाहतात आणि अर्थात असे लोक चांगल्या इंटरनेट पॅकेजच्या शोधात असतात. त्यात जिओ आणि बीएसएनएलने आधीचे हे हेरुन आपापले इंटरनेट प्लान जाहीर केले. आता यात एअरटेल कंपनीही उतरली आहे.

499 रुपयांच्या रिचार्जमध्ये काय काय मिळेल?

एअरटेलच्या ग्राहकांनी 499 रुपयांचाा रिचार्ज केल्यानंतर त्यांना लोकल आणि एसटीडी कॉल, मोफत रोमिंग, दररोज 100 एसएमएस, दररोज 2GB इंटरनेट डेटा मिळेल. म्हणजेच संपूर्ण प्लानचा विचार करता 82 दिवसात तुम्हाला 164GB डेटा (4G/3G) मिळेल.

याआधी जिओने 251 रुपयांचा खास आयपीएल पॅक, तर बीएसएनएलने 248 रुपयांचा पॅक ऑफर केला आहे. त्यामुळे आधीच बाजारात उपलब्ध असलेल्या या प्लानसोबत एअरटेलची स्पर्धा असेल. आयपीएल सुरु असल्याने एअरटेलच्या क्रिकेटप्रेमी ग्राहकांना या ऑफरचा फायदा होईल, हे मात्र नक्की.